Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रहृदयद्रावक! PM मोदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शेतकऱ्याची आत्महत्या, विष प्राशन करुन शेततळ्यात...

हृदयद्रावक! PM मोदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शेतकऱ्याची आत्महत्या, विष प्राशन करुन शेततळ्यात मारली उडी

राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे (Farmer Suicide) सत्र सुरुच आहे. पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या (Suicide due to debt) केली आहे. दशरथ लक्ष्मण केदारी असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (PM Narendra Modi Birthday) देत या शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी (Suicide Note) लिहित त्यामध्ये मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या घटनेमुळे जुन्नरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ केदारी असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद गावामध्ये ते राहत होते. दशरथ यांच्या मालकीची एक एकर शेती आणि एक दुचाकी होती. या दोन्हीसाठी त्यांनी अडीच लाखांचे कर्ज काढले होते. या कर्जाच्या पैशातून मे महिन्यात त्यांच्या हाती कांद्याचं पीक आले. पण तेव्हा कांद्याचा दर 10 रुपये होता. म्हणून त्यांनी कांदा न विकता त्याची साठवणूक केली. त्यासाठी देखील त्यांनी खर्च केला. पण कांद्याचा भाव काही वाढला नाही आणि पावसामध्ये त्यातील अर्धा कांदा खराब झाला.

असे असताना सुद्धा दशरथ यांनी खचून न जाता पुन्हा आपल्या शेतात टोमॅटो आणि सोयाबीनचे पीक घेतले. पण पहिल्या पावसात टोमॅटो खराब झाला. तर मागच्या आठवड्यात झालेल्या पावसात सोयाबीनचे पीक देखील खराब झाले. सोयाबीन पिकांचा पंचनामा करावा यासाठी दशरथ 17 सप्टेंबरला तलाठी कार्यालयात गेले. दोन तास तिथे बसून पंचनाम्याची मागणी त्यांनी केली. पण काहीच यश आले नाही त्यानंतर चिंतेत आलेल्या दशरथ यांनी दुपारच्या सुमारास शेतात जाऊन आधी विष प्राशन केल. त्यानंतर त्यांनी शेत तळ्यात उडी घेत आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी दशरथ यांनी एक चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव न दिल्याची खंत त्यांनी या चिठ्ठीत व्यक्त केली आहे. कांदा-टोमॅटोचे ढासळणारे दर, कोरोना-अतिवृष्टीचं संकट आणि फायनान्स कंपन्या आणि पतपेढीवाले हफ्ता भरण्यासाठीचा लावलेला तगादा या सर्वांना कंटाळले असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहले आहे. ‘आम्ही भीक मागत नाही. अनेक संकटांचा सामना करत आम्ही शेतीत विविध पिकं लावतो, हा एक जुगाराचा प्रकारच आहे. अशा प्रकारांमुळं मी जीवनास कंटाळलो आहे. म्हणून आज मी आत्महत्या करतोय. आम्हाला आमच्या हक्काचा बाजार भाव द्या.’, अशी मागणी त्यांनी मोदी सरकारकडे केली. तसंच त्यांनी या चिठ्ठीमध्ये शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. दशरथ यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -