रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt)स्टारर चित्रपट ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा’ सध्या चर्चेत आहे. 9 सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात चांगली कमाई केली आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. चित्रपटाचा पहिला भाग पाहिल्यानंतर आता प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासोबतच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत सांगितले जात आहे की, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने(Ayan Mukherji)या विषयावर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.
सुपरस्टार शाहरुख खान व्यतिरिक्त ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात आणखी एक कॅमिओ होता ज्याची खूप चर्चा झाली होती. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने चित्रपटात कॅमिओ केल्याचे बोलले जातेय. पहिल्या पार्टमध्ये छोट्याशा शिवाला कडेवर घेऊन एक महिला म्हणजेच अमृताची झलक दाखवली जाते. ज्यांनी चित्रपट पाहिला, त्यांनी दावा केला की, ज्या अभिनेत्रीची चित्रपटात हलकीशी झलक दाखवण्यात आली ती दुसरी तिसरी कोणी नसून दीपिका पदुकोण होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये देखील तसेच बोलले जात आहे. पण निर्मात्यांनी मुद्दाम हा सीन चित्रपटात टाकला का? की त्यामागे काही प्लानिंग होती? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर अयान मुखर्जीने भाष्य केले आहे.
काय म्हणाला अयान मुखर्जी?
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या भागावर आणि दीपिकाच्या कॅमिओवर प्रतिक्रिया दिली. अयानने म्हटले की, ‘ज्या भागाबद्दल लोक प्रश्न विचारत आहेत आणि ती दीपिका पदुकोण आहे असे म्हणत आहेत. ते दृश्य डार्क आहे आणि त्यात पात्राचा चेहरा स्पष्टपणे दाखवलेला नाही. मला वाटते की तुम्ही याची फक्त कल्पना केली असेल कारण ते चित्र इतके गडद होते की त्यात अभिनेत्रीचा चेहरा दिसत नव्हता.’ म्हणजेच अयान मुखर्जीने हे वृत्त सध्या तरी फेटाळून लावले आहे.