करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची बुधवारी स्वच्छता करण्यात आली. प्रतिवर्षी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाभाऱ्याची स्वच्छता होते. या दिवशी देवीचे दर्शन बंद राहते. बुधवारी पहाटे देवीचा अभिषेक झाला. यानंतर देवीच्या मूळ मूर्तीला इरले पांघरण्यात आले होते.
भाविकांच्या दर्शनासाठी देवीची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिराकडे ठेवण्यात आली होती. सायंकाळी सहानंतर पून्हा मूर्तीला अभिषेक करून सालंकृत पूजा बांधण्यात आली. यानंतर देवीचे दर्शन पूर्ववत सुरू करण्यात आले. सध्या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी जोमाने सुरू आहे. नवरात्रोत्सवाला आता काही दिवस राहिल्याने मंदिराची अंतर्बाह्य स्वच्छता सुरू आहेच, पण याशिवाय मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटीही सुरू आहे.