ताजी बातमी ऑनलाईन टीम
वाळवा येथील कृष्णा नदीपात्रात मंगळवारी बुडालेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह तब्बल तीस तासांनी बुधवारी सायंकाळी आढळला. मृत्य व्यक्ती वाळवा तालुक्यातील उरूणवाडी येथील असून चेतन उत्तम कदम असे त्याचे नाव असल्याचे काल रात्री उशिरा स्पष्ट झाले.
मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास चेतन याने येथील हाळभागातील कृष्णा नदीपात्रात आत्महत्या केली होती. मंगळवारी दिवसभर आष्टा पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने नदीपात्रात शोध मोहीम राबवली होती. लाल रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेल्या या अज्ञात इसमाची ओळख बुधवारी रात्री उशिरा पटली. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह ओळखला.
दरम्यान, चेतन हा पदवीधर होता. त्याच्या वडीलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. चेतन एका मेडिकल दुकानात कामाला होता. तो अविवाहित होता. तो नेहमी चिंतेत असायचा. उरूणवाडी ते वाळवा हे दहा किलोमीटर अंतर आहे. एवढ्या लांब तो वाळव्यात कसा आला याबद्दल माहिती गोळा केली जात आहे. घटनास्थळापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर कोट भागात त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यानंतर याबाबतची माहिती आष्टा पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी हवालदार दत्तात्रय भोकरे, गजेंद्र ठाकूर, संतोष शिंदे, चंद्रशेखर पकरे यांनी तातडीने भेट दिली. स्थानिक तरुणांच्या मदतीने अतिशय अडचणीत असलेल्या ठिकाणातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.