राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कट रचला जात असल्याची माहिती एका तरुणाने दिली होती. मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याबाबत खोटी माहिती देणाऱ्या या तरुणाला लोणावळा पोलिसांनी (Lonavala Police) अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील नाशिक फाटो येथून पोलिसांनी 36 वर्षीय अविनाश वाघमारे या तरुणाला अटक केली.
लोणावळ्यातील एका हॅाटेलमध्ये रविवारी दुपारी अविनाश वाघमारे जेवणासाठी एका धाब्यावर आला होता. त्यावेळी त्याने हॅाटेलमध्ये बसून दारु प्यायली. त्यानंतर दारुच्या नशेतच त्याने पिण्याच्या पाण्याच्या बाटलीवरुन हॉटेल मालकाशी वाद घातला. हॉटेल मालकाने त्याला 10 रुपयांची पाण्याची बॉटल 15 रुपयांना दिली. त्यामुळे अविनाश वाघमारे संतप्त झाला.
पाण्यावरुन झालेल्या वादातून हॉटेल मालकाला धडा शिकवण्यासाठी वाघमारे याने महाराष्ट्र पोलिसांच्या 100 या आप्तकालीन क्रमांकावर फोन केला. फोनवरुन त्याने पोलिसांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती दिली. त्या हॉटेलमध्येच बसून अविनाशने हा कॉल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता हा कॉल बनावट असल्याचे समोर आले.
अविनाश वाघमारे हा मूळचा घटकोपर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमधील साठे चाळीतील रहिवाशी आहे. पोलिसांना खोटी माहिती देऊन यंत्रणेची धावपळ उडवणाऱ्या अविनाश वाघमारेचा शोध घेत लोणावळा शहर पोलिसांनी त्याला अटक केली. 177 कलमांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा पोलिसांनी चौकशीनंतर अविनाश वाघमारेला सोडून दिले. अविनाश हा मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले.