Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकुटवाडचे जवान राजेंद्र पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

कुटवाडचे जवान राजेंद्र पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

दिल्ली येथे भारतीय सैन्यदलात सेवा बजावणारे कुटवाड (ता. शिरोळ) येथील जवान राजेंद्र धोंडीराम पाटील यांच्या पार्थिवावर आज (गुरुवार) कुटवाड गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. शिरोळ पोलीस स्टेशन तसेच जिल्ह्यातून आलेल्या सैनिक बांधवांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना दिली.
जवान राजेंद्र पाटील यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी कुटवाड, घालवाड, शिरटी, कनवाड परिसरातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती. राज्य शासनातर्फे राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व प्रशासनातर्फे तहसीलदार अपर्णा मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.


पंधरा दिवसांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र धक्का
पंधरा दिवसांपूर्वी सैन्यदलाचे कर्तव्य बजावताना राजेंद्र पाटील यांना हृदय विकाराचा तीव्र धक्का बसला होता. उपचार सुरू असताना त्यांचे दि १६ ऑगस्ट रोजी निधन झाले. या वृत्ताने कुटवाडसह परिसरातील गावात दोन दिवस शोककळा पसरली होती.
महापुरामुळे कुटवाड स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ पडला होता. नागरिकांनी बुधवारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्मशानभूमी स्वच्छ करून अंत्यसंस्कारासाठी सज्ज केली होती. गावातील प्रमुख मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती.
जवान पाटील यांचे पार्थिव आज (गुरूवार) सकाळी ८ वाजता गावात दाखल झाल्यानंतर पार्थिव मराठी शाळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावर त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. दरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवीतके, सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार, नायब सुभेदार पी. सी. ठोकळ, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासणे, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, सावकर मादनाईक, मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी,
सरपंच रेश्मा कांबळे, उत्तम वेताळ, सैनिक फेडरेशनचे विजय पाटील, आजी माजी सैनिक वेलफेअरचे संजय माने, समीर खानोलकर, रमेश निर्मळे, केरबा कांबळे, महादेव बदामे, दादा खोत, पोपट कांबळे यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -