राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसणळार, असा दावा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडणार नाही, असे देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील अशाच प्रकारचा दावा केला होता.
नेमकं काय म्हणाले अजितदादा?
अजित पवार म्हणाले, शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनानंतर राज्यात नव्याने सत्तेत आलेलं शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार आहे. 145 चा आकडा कमी झाला की, सरकार पडणार… असेही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीत कोणत्याही प्रकारची फूट पडणार नाही,असा दावा देखील अजितदादांनी यावेळी केला. दरम्यान, यापूर्वी जयंत पाटील यांनी देखील शिंदे सरकार कोसळणार असल्याचे भविष्यवाणी सांगितली होती.
शिंदे गटातील कोणताही आमदार आमच्या संपर्कात नाही. मात्र नऊ-दहा आमदार आमच्याजवळ येऊन अंदर की बात सांगत आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आम्ही भूमिका घेणार असल्याचे देखील अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही संयमाने घेत असल्याचे देखील पवार म्हणाले.
दुसरीकडे, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर खोक्यांचा आरोप होत आहे. या आरोपांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
विरोधकांकडून वारंवार होत असलेले ‘खोके सरकार’च्या आरोपांवर चंद्रकात पाटील यांनी खोक्यांचा अर्थ समजवून सांगितला आहे. आंब्यासाठी वापरले जाणारे खोके, हाच अर्थ आमच्यासारख्या सामान्यांना माहित आहे. जयंत पाटील यांनी खोक्यांचा चांगला अर्थ माहित आहे. कारण त्यांनी खोक्यांचा वेगळा अनुभव घेऊन महाराष्ट्राची वाट लावली, असा घणाघाती आरोप देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ग्रामविकासात 1500 कोटी रुपयांचा टेंडर घोटाळा झाला. त्यामुळे खोक्यांची सवय जयंत पाटील यांचाच आहे, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
आता वारसदारांमध्ये सामना रंगणार…
शिवसेना कुणाची? असा सामना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रंगला आहे. आता या वादाची ठिणगी वारसदारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आता वारदारांमध्ये म्हणजेच आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सामना रंगणार आहे. 7 नोव्हेंबरला सिल्लोड मतदारसंघात दोन्ही युवा नेते शक्तिप्रदर्शन करणार करणार आहे. दोन्ही सभांकडे संपूर्ण महाराष्ट्रांचं लक्ष लागलं आहे.