राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad arrested)यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणणे आणि प्रेक्षकांना मारहाण करणे या आरोपांनंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी त्यांना अटक केली. ठाणे पोलिसांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासह सुमारे शंभर जणांवर गुन्हा दाखल केला होता. सोमवारी आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी ठाणे (Thane)शहरातील मल्टिप्लेक्समध्ये घुसून इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करत ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवू नका अशी आव्हाडांची मागणी होती.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले….
अटक केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे. मला कसं लढायचं आहे हे मला माहीत आहे. यासोबतच मी जामिनासाठी कोणताही अर्ज करणार नाही. पोलिसांना जी कारवाई करायची आहे ती करु द्या. तसेच मला अडकवण्यासाठी चुकीची कलमं माझ्यावर लावण्यात आली आहे. असं देखील आव्हाड म्हणाले आहेत. यासोबतच ‘हा पोलिस बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.’ असे ट्विट आव्हाडांनी केले आहे. आव्हाडांना अटक होताच त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
अशी आहे तक्रार
या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्रेक्षकांनी पैसे परत मागितल्यावर आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यापैकी काहींना मारहाण केली असा आरोप आहे. प्रेक्षकाच्या तक्रारीवरून आव्हाड यांच्या विरोधात वर्तकनगर पोलिसात गुन्हा कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलिस कायदा कलम 37/135 च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘हर हर महादेव’ सिनेमाला विरोध का?
‘हर हर महादेव’ या सिनेमामध्ये इतिहासासोबत छेडछाड केल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधील अनेक प्रसंग चुकीच्या पद्धतीने दाखवले असल्याचे आव्हाडांनी म्हटले. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात शिवाजी महाराजांचे सेनापती बाजी प्रभू देशपांडे यांचाही एक प्रसंग आहे. ज्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशीच युद्ध करत असल्याचे दिसतेय. या दोघांमधील युद्धाचा हा प्रसंग चुकीचा असल्याचा आरोप आहे.






