ज्या पोलीस दलात वडिलांनी नाव कमावलं त्याच पोलीस दलात वडिलांची खाकी वर्दी घालून एका मुलाने अनेकांना लाखो रुपयांचा चुना लावला. मुलाच्या या कारनाम्यामुळे वडिलांच्या कारकिर्दीला आणि खाकी वर्दीलाही डाग लागला आहे पोलिसाच्या या दिवट्याने खाकी वर्दी घालून एकाची लाखो रुपयांच्या बिटक्वाईनची फसवणूक केली आणि जेलची हवा खातोय.
रुबाबदार खाकी वर्दी. या वर्दीवर तीन स्टार असले की, मग भले भले सलाम ठोकतात. खाकी वर्दीतील हा पोलीस अधिकारी किती रुबाबदार दिसतोय. पोलीस उपनिरीक्षक आर एल जगताप असं या अधिकाऱ्याचे नाव आहे.
रस्त्यात जाणारी एक रिक्षा थांबवून या अधिकाऱ्याने रिक्षा बसलेल्या एका तरुणाची चौकशी केली आणि त्या तरुणाने सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टमुळे गुन्हा घडला, असं सांगून त्या तरुणाचा मोबाईल घेतला आणि तपासून परत दिला. पण थोड्याच वेळाने त्या तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे कळाले म्हणून तो तरुण कळवा पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्या पोलीस अधिकाऱ्याबाबत पोलिसांना विचारले असता त्याच्या पाया खालची वाळूच सरकली. कारण खाकी वर्दीतला तो अधिकारी पोलिसच नव्हता. चौकशीकरता तरुणाचा मोबाईल घेवून काही सेकंदातच त्या तोतया पोलिसाने तरुणाच्या मोबाईल मधून जवळपास 6 लाख रुपयांचे बिटक्वाईन स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करुन त्या तरुणाची फसवणूक केली.
रामदास लक्ष्मण जगताप असं त्या तोतया पोलिसाचे नाव असून रामदासने खाकी वर्दीचा फायदा घेवून अनेकांची फसवणूक केली आहे. धक्कादायक म्हणजे, त्याचे वडील हे निवृत्त पोलीस अधिकारी आहे. त्यांचा ड्रेस घालून या दिवट्याने फसवणुकीचे दुकान उघडले होते. विशेष म्हणजे, बीटक्वाईनमध्ये व्यवहार करणाऱ्यांना या तोतया पोलिसाने फसवलंय. यामागे एक मोठी टोळी असल्याचा ही पोलिसांना संशय आहे. लवकरच या टोळीचा ठाणे पोलीस पर्दाफाश करणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणे पोलीस करत आहे.





