ताजी बातमी ऑनलाइन टीम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना पावसामुळे रद्द करण्यता आला आहे. हा सामना रद्द झाल्यानंतर आता यजमान न्यूझीलंड संघ या मालिकेत 1-0 ने पुढे आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना क्राइस्टचर्चमध्ये खेळवला जाणार आहे. पहिला सामना किवी संघाने 7 गडी राखून जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना पावसामुळे थांबवण्यात आला आणि षटके कमी करण्यात 29 षटकांचा करण्यात आला. मात्र पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पंचांनी सामना रद्द ठरवला.
सूर्यकुमार-शुभमन चांगले फॉर्मात
पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करण्याची चांगली संधी होती. टीम इंडियाचे फलंदाज चांगल्या लयीत दिसत होते. या सामन्यात पहिली विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यांनी 12.5 षटकात 89/1 धावा केल्या. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे पंचानी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला बरोबरी साधण्याची एकच संधी मिळणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी
शिखर धवनची विकेट गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल क्रीजवर होते आणि दोघेही चांगल्या लयीत दिसत होते. सूर्या 34 आणि शुभमन गिल 45 धावांवर नाबाद खेळत होते. आता तिसऱ्या सामन्यातही हे दोन्ही फलंदाज अशाच लयीत दिसतली अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे. तिसरा सामना 30 नोव्हेंबर रोजी क्राइस्टचर्च येथे खेळवला जाईल. या सामन्यात शिखर धवन अँड टीम जिंकल्यास मालिका बरोबरीत सुटेल. मात्र हा सामना रद्द झाल्यास किंवा भारताचा पराभव झाल्यास मालिकेत बरोबरी साधण्याची संधीही भारतीय संघाच्या हातातून निघून जाईल.
शिखर धवन स्वस्तात बाद
या मालिकेत कर्णधार शिखर धवनने पहिल्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले होते. मात्र या सामन्यात तो स्वस्तात माघारी परतला. पावसानंतर सामना सुरू झाला तेव्हा तो केवळ 3 धावा करून बाद झाला. मॅट हेन्रीने त्याला लॉकी फर्ग्युसनकरवी झेलबाद केले. एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाने टी-20 सामन्यात किवी संघाचा पराभव करून मालिका जिंकली. भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली हा मालिका-विजय नोंदवला. आता तिसरा आणि निर्णायक सामना क्राइस्टचर्चमध्ये खेळवला जाणार आहे.