Monday, March 4, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : धामणी खोऱ्यात पाटबंधारे विभागाकडून मनमानी पद्धतीने उपसा बंदी

कोल्हापूर : धामणी खोऱ्यात पाटबंधारे विभागाकडून मनमानी पद्धतीने उपसा बंदी

धामणी खोऱ्यात पाटबंधारे विभागाने अचानक नदीतील पाणी उपसा बंदी आदेश लागू केल्याने शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली आहे. परिणामी शेतकऱ्यांतून पाटबंधारे विभाग व महावितरण यांच्या कार्य पद्धती विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर संबंधित आदेशा विरोधात एका शेतकऱ्याने शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे.
धामणी नदी राधानगरी,पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातून वाहते. नदीवरील धामणी प्रकल्प रखडल्याने या विभागात कोणत्याही प्रकारचा जलाशय उपलब्ध नसल्याने येथील स्थानिक शेतकरी स्वखर्चाने नदीवर जागोजागी मातीचे बंधारे उभारून पाणीसाठा करतात.

मात्र यावर्षी पाटबंधारे विभागाने आपल्या शासकीय बंधाऱ्यात नैसर्गिक पावसाचे पाणी अडवण्यासाठी वेळाने उपाययोजना केली. परिणामी नदीवरील खालील बंधाऱ्यांमध्ये अत्यल्प पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे नदीच्या उगम स्थानातील मातीच्या बंधाऱ्यांमधील पाणी खालील बंधाऱ्यात आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने अचानक उपसा बंदी आदेश लागू करुन जर्गी (ता.गगनबावडा) ते आंबर्डे (ता. पन्हाळा) पर्यंतच्या सर्व बंधाऱ्यातील उपसा बंद ठेवण्याचे आदेश दिला आहे.

कोल्हापूर पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता आर.पी बांदिवडेकर यांनी या भागातील शेतकऱ्यांना उपसा बंदी विषयी कोणतीही पूर्व कल्पना न देता दिनांक १ डिसेंबर रोजी रात्री उपसाबंदीची नोटीस काढली. त्यानुसार महावितरण विभागाने येथील शेतकऱ्यांच्या शेतीस होणारा वीज पुरवठा खंडित केला आहे. तसेच यातून उपसा केलाच तर संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

कोल्हापूर पाटबंधारे विभागाने अचानक उपसा बंदी आदेश लागू केल्याने शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे खोळंबली असून शेतकऱ्यांतून पाटबंधारे विभाग व महावितरण विषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.मात्र गेले काही दिवसापासून धामणी खोरा परिसरातील शेतीचा वीजपुरवठा खंडित असतानाही पाटबंधारे विभागाने अचानक दिलेल्या या उपसा बंदी आदेशामुळे शेतकऱ्यांची ऊस लागण, मका पेरणे आदी कामे खोळंबल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. परिणामी उपसा बंदी आदेश तात्काळ मागे न घेतल्यास येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंद …!
संबंधितांनी कोणतीही पुर्व कल्पना न देता उपसा बंदी आदेश काढल्याने अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली असून आर्थिक नुकसान होणार आहे. तर उपसा बंदी आदेशाबाबत राज्य शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवली आहे. तरी मागे न घेतल्यास आम्ही सर्व शेतकरी न्यायालयात दाद माग आहोत. – पांडूरंग ज्ञानू सावत, शेतकरी, म्हासुर्ली- सावतवाडी

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -