ताजी बातमी ऑनलाईन टीम
अक्षय कुमारने मंगळवारी मुंबईत ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या पहिल्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित पीरियड ड्रामा चित्रपटात खिलाडी अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीय या चित्रपटातील कलाकारांच्या नावांची घोषणा झाली होती. आता अक्षय कुमारने स्वतः सोशल मीडियावर त्याचा या चित्रपटातील लूक शेअर केला आहे. तसेच चित्रपटाची शूटिंग सुरु झाल्याची माहिती देखील दिली आहे.
अक्षयने सेटवरील त्याच्या पहिल्या दिवसाविषयी एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसमोर हात जोडून पोज दिली. यासोबत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज मी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाचे शूटिंग करत आहे, ज्यामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे भाग्य लाभले आहे.” त्यांच्या जीवनातून आणि माँ जिजाऊंच्या आशीर्वादाने प्रेरणा घेऊन मी माझ्या परीने प्रयत्न करेन. तुमचे आशीर्वाद कायम ठेवा.’ असं अक्षय कुमार म्हणाला आहे.
व्हिडिओ देखील केला पोस्ट
अभिनेत्याने आणखी एक पोस्ट देखील शेअर केली ज्यामध्ये त्याने सेटवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत आपला पूर्ण गेटअप दाखवला आहे. इंस्टाग्राम रील्सवर पोस्ट केलेल्या क्लिपमध्ये, अक्षय कॅमेर्याकडे चालताना दिसत आहे, तर बॅकग्राउंडमध्ये ‘जय शिवाजी, जय भवानी’ या घोषवाक्य असलेले एक आकर्षक गाणे वाजत आहे. त्याने त्याच्या पोस्टला ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे कॅप्शनही दिले आहे.
या मराठी चित्रपटात जय दुधने, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या, अक्षय, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांच्याही भूमिका आहेत. वसीम कुरेशी निर्मित ‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ हा चित्रपट 2023 च्या दिवाळीला मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम सेतू’ चित्रपटात अक्षय अखेरच्या वेळी दिसला होता. त्याने नुकताच आयुष्मान खुराना-स्टारर एन अॅक्शन हिरोमध्ये एक कॅमिओ केला होता जो थिएटरमध्ये सुरु आहे.