महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा पास न झालेल्या विद्यार्थ्यांनाही नोकरीत प्राधान्य दिलं जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कंत्राटी भरतीत प्राधान्य
मंत्री पाटील म्हणाले, की ‘एमपीएससीची पूर्व परीक्षा पास झालेल्या, पण मुख्य परीक्षेत फेल झालेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या कंत्राटी नोकर भरतीत प्राधान्य देण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे सरकारचा पैसा वाचेल नि तरुणांनाही नोकरी मिळेल.’
‘कंत्राटी नोकर भरती करणाऱ्या ठेकेदाराकडून कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होते. व्यवस्थित पगार दिला जात नाही. त्याऐवजी एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत फेल विद्यार्थ्यांची भरती केल्यास, अनेक प्रश्न सुटतील.’
राज्य सरकार सध्या फक्त या निर्णयावर विचार करीत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलूनच जाहीर करणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.