वाकरेपैकी पोवारवाडी (ता. करवीर) येथील सुहास उर्फ शुभम एकनाथ पोवार (वय २५) या तरुणाने सोमवारी रात्री विष प्रशांत केले होते, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत घटनास्थळ आणि करवीर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मयत सुहास हा कोल्हापुरातील गुजरीत एका सराफी पेढीवर नोकरीस होता. त्याचे वडील एकनाथ पोवार हेही कोल्हापुरातील एका सराफी पेढीवर नोकरीस आहेत. दररोज हे पिता-पुत्र एकाच गाडीवरून नोकरीवर जात होते. सोमवारी सायंकाळी रात्री वडिलांना एका कार्यक्रमासाठी जायचे असल्यामुळे मयत सुहास हा स्वतःची गाडी घेऊन नोकरीवर गेला होता. सोमवारी रात्री वडील एकनाथ हे त्याला आपल्यासोबत कार्यक्रमासाठी बोलावत होते.
मात्र सुहासने या कार्यक्रमासाठी येण्यास नकार देऊन आपण घरी जात असल्याचे सांगितले. मात्र रात्री नऊच्या सुमारास घरी येत असताना त्याने ग्रामोजन हे विषारी तणनाशक सोबत घेतले. दोनवडे फाटा ते पोवारवाडी या रस्त्यावरील एका आडवळणाला रात्री नऊच्या सुमारास त्याने ग्रामोजन हे विषारी तणनाशक प्राशन केले. याच दरम्यान पोवारवाडीतील नितीन पाटील आणि प्रदीप पाटील हे काही कामानिमित्त दोनवडे येथे चालले होते. दरम्यान गावातीलच एका कार्यकर्त्याचा भेटण्यासाठी फोन आल्यामुळे त्यांनी त्या कार्यकर्त्याला याच ठिकाणी भेटावयास बोलवले. यावेळी त्यांना बाजुला कोणीतरी धडपडत असल्याचे निदर्शनास आले. मात्र ही व्यक्ती अनोळखी असल्याने गाडीवरून त्यांनी शोधाशोध करायचा प्रयत्न केला. दरम्यान सुहासच्या मोबाईलची रिंग वाजू लागल्याने त्यांनी फोन उचलला असता तो त्याच्या आईने केल्याचे आणि सुहास कुठे आहे ?
असे विचारणा केल्याने तो सुहास आहे हे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित सचिन पोवार यांना याबाबतची माहिती दिली. त्वरित माजी उपसरपंच विजय पोवार यांनी तातडीने सुहासला रात्री दहाच्या सुमारास कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरनी त्याला डायलिसिस करण्यासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. रात्री खाजगी रुग्णालय त्याच्यावर दोन वेळा डायलिसिस करण्यात आले. मात्र त्याची तब्येत गंभीर झाल्याने मंगळवारी सकाळी त्याला पुन्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुपारी तीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.शवविच्छेदन करून सायंकाळी पाचच्या सुमारास त्याच्यावर पोवारवाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, चुलते असा परिवार आहे.याची करवीर पोलिसात नोंद झाली आहे.
शांत स्वभावाच्या सुहासचा टोकाचा निर्णय- अत्यंत शांत स्वभावाच्या सुहासने कोणालाही कोणत्याही प्रकारचा सुगावा न
लागू देता आत्महत्या केल्याने पोवारवाडीतील सर्वांना याचा धक्का बसला.
गेल्या शुक्रवारी पोवारवाडीतील सुहासच्या गल्लीतील युवराज भिकाजी पोवार या तरुणाने कोणतेही कारण नसताना आत्महत्या केली होती. त्याच्या घराशेजारीच राहणाऱ्या सुहासने आत्महत्या केल्याने पोवारवाडीवर शोककळा पसरली आहे.