कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुवर्ण महोत्सव वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा प्रशासकांच्या हस्ते शाल, साडीचोळी, रोप व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात व शहरात आलेल्या महापुरात चांगलं काम केल्याचे म्हणाल्या. कोल्हापुरात चांगल्या गोष्टीसाठी एखादे पाऊल उचलले, की नागरीक व सामाजिक संस्था स्वत:हून आपला सहभाग नोंदवतात हेच आपले यश आहे. त्या पुढे म्हणाल्या की, शहरातील प्रत्येक नागरिक जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत ज्या एका संस्थेशी संपर्कात असतो ती म्हणंजे आपली महानगरपालिका. प्रत्येक कर्मचारी, अधिकारी अथवा व्यक्ती यांचे जीवनामध्ये काहीना काही तरी योगदान असते. परंतु, हे योगदान देत असताना आपल्याला कोठे सुधारण्याची गरज आहे, कोठे चांगली कामगिरी करुन दाखण्याची गरज आहे हे प्रत्येकासमोर असले पाहिजे.
महापालिकेने यावर्षी विविध उपक्रम हाती घेतले असून सर्वांचे योगदान आवश्यक आहे. पुढील वर्धापन दिनादिवशी यावर्षी पेक्षाही जास्त सत्कार होतील त्याबद्दल मला खात्री आहे. महापालिका यावर्षी केंद्र शासनाच्या स्वच्छता सर्वेक्षण रँकमध्ये नकीच अव्वल येण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी सर्वांनी आपले योगदान दिले पाहिजे. आपला परिसर कसा स्वच्छ दिसेल यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा सत्कार
दरम्यान, शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा प्रशासकांच्या हस्ते शाल, साडीचोळी, रोप व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये जवान निवृत्ती मरळे यांची सून ज्योति मरळे, जवान लक्ष्मण रावराणे यांची सून स्मिता रावराणे, जवान जयसिंग भोसले यांची पत्नी श्रीमती कांचनदेवी भोसले, कॅप्टन शंकर वालकर यांच्या वहिनी सौ.माणिक वालकर, जवान सुनील चिले यांचे भाऊ अनिल चिले, मेजर मच्छिंद्र देसाई यांची पत्नी श्रीमती सुनिता देसाई, जवान दिगंबर उलपे यांची आई श्रीमती आनंदी उलपे, जवान अभिजीत सुर्यवंशी यांची आई श्रीमती मनिषा सुर्यवंशी, मेजर सत्यजित शिंदे यांचे भाऊ व्यंकोजी शिंदे या देशाच्या रक्षणाकरीता धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे सेवा बजावित असताना शहीद झालेल्या स्टेशन ऑफिसर भगवान जाधव यांची पत्नी श्रीमती जाई जाधव, फायरमन श्रीकांत पाटील यांची पत्नी श्रीमती अंजनी पाटील, फायरमन दत्तात्रय खामकर यांचा भाऊ शिवाजी खामकर, फायरमन अशोक माने यांची बहिण भाग्यश्री डकरे यांचा सत्कार करण्यात आला.
महापालिका कर्मचाऱ्यांकडून पंचगंगा स्मशानभूमीस 50 हजार शेणी दान
दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांकडून 50 हजार शेणी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. पंचगंगा स्मशानभूमीस महापालिकेचे कर्मचारी दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त शेणी दान देतात. महापालिका कर्मचाऱ्याकडून गेली 10 वर्षे पंचगंगा स्मशानभुमीस शेणी प्रदान करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दुसरीकडे, गुरुवारी शहरामध्ये पाच हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. सकाळी पंचगंगा घाट येथील गायकवाड पुतळा येथील महापालिकेच्या ओपन स्पेमध्ये प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अभिनेता सुबोध भावे यांनीही वृक्षारोपणाची माहिती कळताच त्यांनी स्वत: या उपक्रमात सहभागी होऊन वृक्षारोपण केले. कसबा बावडा झूम प्रकल्प, पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रातील मुख्य रस्त्याच्या बाजूस, पुईखडी बायोगॅस प्रकल्पाजवळ, कसबा बावडा कचरा प्रकल्प, कसबा बावडा फिल्टर हॉऊस या ठिकाणी महापालिकेच्या विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करण्यात आले.