विश्रांती घेतलेल्या मान्सूननं राज्यात पुन्हा एकदा चांगली हजेरी लावली आहे. आज महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा इशारा हवामानखात्याकडून देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात आज काहीठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे
.
विदर्भात देखील आज सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी आज आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात आज सर्वत्र पाऊस असणार, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
नाशिक, पालघरसाठी आॅरेंज अलर्ट आज जारी करण्यात आला आहे. ज्यात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंतचा पाऊस हा नाशिक आणि पालघरमधल्या काही भागात पडण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, रायगड परिसरात आज चांगला पाऊस बघायला मिळतो आहे. ज्यात काही ठिकाणी पावसाची संततधार देखील बघायला मिळाली. उत्तर महाराष्ट्रात आज आणि उद्या चांगला पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये आज चांगला पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ह्या तिन्ही जिल्ह्यात आज आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात 24 तासात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंत पाऊस ह्या जिल्ह्यातील काही ठिकाणी अपेक्षित आहे.
मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. ज्यात औरंगाबाद, जालना(jalna), परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
उद्या देखील उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. ज्यात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात काहीठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.