करोनाची चौथी लाट रोखण्यासाठी भारताने कडक पावले उचलायला सुरवात केली आहे. चीनमध्ये कोरोना वाढताना दिसत असताना भारत सरकारने मात्र चीन आणि जपानमधून येणाऱ्या नागरिकांसाठी कठोर निर्णय घेतला आहे. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं असून प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय केले जात आहेत. चीन, जपान, कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंगही केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.
चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य असेल. विमानतळावर या प्रवाशांमध्ये कोविड 19 ची लक्षणे आढळल्यास किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशांना क्वारंटाईन केलं जाईल. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी दिली.