अविवाहित मुलांना चांगले स्थळ मिळवून देतो, असे सांगून घटस्फोटित महिलांशी लग्न लावून देत मुलांच्या भावनेशी खेळण्याचा फंडा एजंटाकडून होत आहे. मुली मिळत नसल्याने एजंटांच्याकडून होणार्या मागणीला मुलांचे माता-पिता बळी पडत आहेत. आर्थिक लूट होत आहे. विवाह लावून देऊन दोन महिने संसार करून पुन्हा सोन्याच्या दागिन्यांसह पसार होणार्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. त्यामुळे पालकांनी याबाबतीत दक्ष राहणे गरजेचे आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर परिसरातील काही बंटी-बबली महिला व पुरुष एजंट कुरुंदवाडसह परिसरात वरांना गाठून त्यांना सोलापूर, पंढरपूरसह कर्नाटकातील हुबळी, धारवाड, अथणी जिल्ह्यातील घटस्फोटित मुलींचा फोटो-बायोडाटा दाखवतात. स्थळ पाहायला गेल्यानंतर मुलाच्या आई-वडिलांना एजंट मुलगी पसंत असेल तर तत्काळ लग्न करून टाकू, मुलीच्या आई-वडिलांचा आमच्यावर विश्वास आहे. तुमचे घर नंतर पाहायला येतील, अशी मुलगी परत मिळणार नाही, असे सांगून गळ घातली जाते. आपल्या मुलाचा विवाह होत आहे म्हणून आनंदात आई-वडील हुरळून जाऊन पैसे देतात आणि त्यांची आर्थिक फसवणूक होते. मुलगी दोन महिने संसार करते आणि एक दिवस अंगावरील सोन्याच्या दागिन्यासह पसार होते.
हे एजंट नव्याने पुन्हा नवरी मुलींना सोबत घेऊन मुलांचे सावज हेरून त्यांच्याशी लग्न जुळवून आर्थिक लुटीचा डाव मांडला जातो. एजंटांनी सुरू केलेला या लुटीच्या डावाचे अनेक माता-पिता बळी पडत आहेत. या एजंटांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. अनेक माता-पित्यांनी व मुलांनी फसवणुकीबद्दल कुठे न्याय मागायचा, असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे.
फसवणुकीचा धंदा
मुलगा हा वंशाचा दिवा, अशी पिढ्यान्पिढ्या लोकांची धारणा झालेली आहे. जीवनाच्या अंतिम क्षणी जर आपल्या मुलाने आपल्याला मुखाग्नी दिली तरच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, अशी काही जुनाट विचारांच्या लोकांची भावना आहे. त्यामुळे पहिले अपत्य मुलगाच झाला पाहिजे म्हणजेच आपला वंश व त्याचे नाव पुढे चालत राहील याच विचारातून अनेकांनी स्त्री-भ्रूणहत्येमुळेच आज समाजात मुलींची कमतरता निर्माण झाली आहे. एजंटांनी याचाच फायदा उचलून समाजामध्ये फसवणुकीचा धंदा सुरू केला आहे. त्यावेळच्या चुकीचे परिणाम आत्ता दिसून येत आहेत.