तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारतीय राष्ट्र समिती या पक्षाने आता महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड येथे चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पहिली जाहीर रॅली पार पडली. यावेळी त्यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर टीका केली. या सभेला लोकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळाले.
भारत राष्ट्र समिती तेलंगणापुरती मर्यादित होती. मात्र देशातील वातावरण पाहून आम्ही राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी तयार झालो आहोत असं चंद्रशेखर राव यांनी म्हंटल. यावेळी केसीआर यांनी ‘अब कि बार किसान सरकार’ अशी घोषणा दिली. राज्यातील शेतकरी आत्महत्येला हात घालत त्यांनी देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ह्या महाराष्ट्रात होत असल्याचा दावा केला. देशाच्या अन्नदात्यावर आत्महत्या करण्याची वेळ का येते? असा सवाल करत केसीआर यांनी शेतकरी आणि कामगारांना एकजूट होण्याचे आवाहन केले.
देशाच्या आजच्या परिस्थितीला काँग्रेस आणि भाजप दोन्हीही जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला. 54 वर्षे काँग्रेसने सत्ता उपभोगली आणि 16 वर्षे भाजपने सत्ता केली आणि दोन्ही पक्ष फक्त एकमेकांवर आरोपच करत आहेत असं केसीआर यांनी म्हंटल. दरम्यान, चंद्रशेखर राव यांच्या भारतीय राष्ट्र समितीने महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री केल्याने राज्याच्या राजकारणात याचा मोठा परिणाम पहायला मिळू शकतो.