Wednesday, July 30, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : पत्नी, दोन मुलांना कालव्यात ढकलून पतीने संपवली जीवनयात्रा

कोल्हापूर : पत्नी, दोन मुलांना कालव्यात ढकलून पतीने संपवली जीवनयात्रा

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीशेजारी असलेल्या डाव्या कालव्यात पत्नीसह दोन मुलांना ढकलून देत पतीने भोज येथे झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवली.दरम्यान, मुलीला वाचवण्यात यश आले असून हा प्रकार शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सौ. राजश्री संदीप पाटील (32) व मुलगा सन्मित (8, रा. हलसवडे, ता. करवीर) अशी मृतांची नावे आहेत. जखमी मुलगी कु. श्रेया (14) हिच्यावर कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत; तर संदीप अण्णासोा पाटील असे जीवनयात्रा संपवलेल्या तरुणाचे नाव आहे.

संदीप पाटील (36, रा. भोसले गल्ली, हलसवडे, ता. करवीर) हा पत्नी आणि दोन मुलांसह शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास डाव्या कालव्याजवळ आला. त्याने पत्नीसह पोटच्या दोन मुलांना कालव्यात ढकलले आणि दुचाकीवरून पळ काढला. दरम्यान मुलगी श्रेया कशीतरी पाण्याबाहेर येण्यात यशस्वी ठरली.घटनेची माहिती मिळताच कागल पोलिस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पाणबुडीच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू केली. सायंकाळी सौ. राजश्री व सन्मित यांचे मृतदेह मिळाले.

घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, कु. श्रेया ही कालव्यातून पाण्याच्या कडेला जखमी अवस्थेत मदतीसाठी ओरडताना स्थानिक ग्रामस्थांना दिसली. ग्रामस्थांनी तिला बाहेर काढून तत्काळ कसबा सांगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी तिने आपले आई-वडील व भाऊ पाण्यात असल्याची माहिती दिली. डोक्याला गंभीर जखम झाल्याने तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

पाटील कुटुंबीय हलसवडे येथील ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस राहते. संदीप यांचा साऊंड सिस्टीमचा व्यवसाय आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे विभागीय पोलिस अधिकारी संकेश गोसावी यांनी भेट दिली. कागल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक माहिती समजू शकेल, असे कागल पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

संदीप पाटील याचा पोलिस शोध घेत असताना त्याने भोज येथे आपली दुचाकी रस्त्यावर पार्क करून शेतवडीत जाऊन गळफास घेतला. हा प्रकार सायंकाळी उघडकीस आला.

घटनेची माहिती सदलगा पोलिसांना देण्यात आली. चिकोडीचे डीएसपी बसवराज यलीगार यांच्यासह सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भरतगौडा, सहायक उपनिरीक्षक एस. एम. सनदी यांनी घटनास्थळी भेट दिली.

यावेळी संदीप याने जीवनयात्रा संपवण्यापूर्वी पार्क केलेल्या दुचाकी नंबरच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, संदीपच्या पँटच्या खिशात पत्नी व मुलाचे आधार कार्ड सापडले. त्यानुसार पोलिसांनी आधार कार्डवर असलेल्या मोबाईलवर संपर्क साधला असता संदीपची ओळख पटली. त्यानंतर नातेवाईकांना पाचारण करण्यात आले.कालव्याच्या या परिसरात वर्दळ कमी असल्याने शुकशुकाट असतो. सुदैवाने आणि आश्चर्यकारकरीत्या जखमी अवस्थेत पोहता येत असल्याने बाहेर आलेल्या कु. श्रेया हिने मदतीसाठी हाक मारली. नागरिकांना तातडीने धाव घेत रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -