पेठ ते शिराळा या रस्त्यावर रेठरे धरण तलावाजवळील उताराजवळील ओढ्यामध्ये उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली सुमारे चाळीस फुट खोल ओढ्यामध्ये कोसळून भीषण अपघात झाला.या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असून ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात काल, गुरुवारी (दि.२३) रात्री उशिरा घडला.
याबाबत माहिती अशी की, पंढरपूर येथील दिगंबर पाटील यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक (MH-१०-DE-३५९२) हा उंब्रज येथे ऊस भरून पेठ नाका ते शिराळा या रस्त्याने विश्वास सहकारी साखर कारखान्याकडे निघाला होता. दरम्यान रेठरे धरण येथील तलावाजवळ ट्रॅक्टर आला असताना उताराजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला लावलेले, लोखंडी ग्रील तोडून ट्रॅक्टर दोन ट्रॉली सह सुमारे चाळीस फूट खोल ओढ्यात कोसळला. यावेळी मोठा आवाज झाला.
सुदैवाने चालक ट्रॅक्टर मधून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर ट्रॅक्टरच्या मागे असलेल्या अन्य ट्रॅक्टर चालकांनी व परिसरातील ग्रामस्थांनी जखमी चालकाला ओढ्यातून बाहेर काढले व उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.