अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर सुमारे सहा महिन्यांनी खुले होणार आहे. मात्र, कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आल्याने भाविकांना मंदिरात प्रवेश करताना सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने नियमावली तयार करण्यात आली आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात येणार्या भाविकांसाठी या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. या नियमावलीबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याबरोबर चर्चा करून अंतिम मंजुरी घेऊनच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
नाईकवाडे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे उघडण्याबरोबरच नियमावलींचे पालन करण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्याबरोबरच अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सवासाठीही नियमावली प्रशासनाकडून केली जाणार आहे. यामध्ये गतवर्षीप्रमाणे मंदिरातील पूर्व दरवाजातून प्रवेश, दक्षिण दरवाजातून बाहेर पडणे, मंदिर परिसरातील दुकानदारांना द्यावयाच्या सूचना, श्रीपूजकांची संख्या या सर्व गोष्टींबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.
दरम्यान, रविवारीही मंदिरात नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी सुरूच होती. मंदिराच्या मुख्य स्थापत्याची स्वच्छता व शिखरांच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिरात प्रवेश करणार्या चारही प्रवेशद्वारांची स्वच्छता अत्याधुनिक साधन सामग्रींच्या सहाय्याने सुरू करण्यात आली आहे.