Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरप्रवाशांच्या मुद्देमालावर चोरट्यांचा राजरोसपणे डल्ला!

प्रवाशांच्या मुद्देमालावर चोरट्यांचा राजरोसपणे डल्ला!

एसटी पकडण्याच्या घाईत पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांनो सावधान… कारण मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. एसटी पकडायची की बॅग सांभाळायची अशी अवस्था सध्या प्रवाशांची झाली आहे. गेल्याच आठवड्यात मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून 4 प्रवाशांच्या बॅग चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता तरी शाहूपुरी पोलीस याकडे गांभिर्याने लक्ष देणार काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोल्हापुरातील अनेकजण नोकरीनिमीत्त पुणे, मुंबई अशा महानगरात स्थायिक झालेले आहेत. याचसोबत सध्या परीक्षांचा काळ संपत आल्याने गावी, पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. हीच संधी साधत चोरटे सक्रिय होत आहेत. दरवर्षी या काळात या प्रवाशांच्या किमती ऐवजावर तसेच त्याच्या खिशातील रोकड आणि मोबाईल संच हातोहात लंपास करण्यावर चोरट्यांचा भर आहे. गेल्याच आठवड्यात गर्दीचा फायदा घेवून चोरट्यांनी सुमारे 10 तोळे दागिन्यांवर डल्ला मारला आहे. याचसोबत 15 मोबाईल, 5 लॅपटॉप आणि जवळपास 10 दुचाकी लंपास केल्या आहेत. एकापाठोपाठ घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण आहे. या चोरट्यांचा बंदोवस्त करावा, अशी मागणी होत आहे.

गर्दीचा फायदा घेवून चोरी करणाऱ्या जयसिंगपूर, हातकणंगले, राजेंद्रनगर, सदरबाझार येथील महिलांची टोळ्या कार्यरत आहेत. 5 ते 6 महिला असतात. त्यांच्या कडेवर लहान मुल असते. गर्दीचा फायदा घेवून प्रवशांच्या पर्स, मोबाईल, दागिन्यांसह इतर मुद्देमालावर त्या डल्ला मारतात. यानंतर हा मुद्देमाल आपल्या साथीदाराकडून बाहेर नेला जातो. यामुळे या महिलांवर संशय घेण्याचा प्रश्न येत नाही. काही वेळातच हा मुद्देमाल बाहेर पोहोचवला जातो. मात्र चोरी करणाऱ्या महिला याच ठिकाणी दुसरे सावज शोधत असतात.

एखाद्या बसमध्ये चोरी केल्यानंतर चोरीचा मुद्देमाल दुसऱ्या साथीदारांकरवी बाहेर पाठवला जातो. मात्र चोरी करणारी महिला बसमध्येच बसून थांबते. एखाद्या वेळी बसमधील प्रवाशांची तपासणी केली तर तो मुद्देमाल सापडत नाही कारण तो आधिच बाहेर गेलेला असतो. तपासणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यासमोर लहान मुलांना मुद्दाम रडविण्याचे नाटकही केले जाते. जेणेकरुन त्याचे लक्ष विचलीत होईल.

मध्यवर्ती बसस्थानकामध्ये एक पोलीस चौकी आहे. येथे कायमस्वरुपी पोलीस नेमणे अपेक्षीत आहे. मात्र बहुतांशी वेळा या ठिकाणी पोलीसच नसतात. यामुळे चोरटे याचा लाभ घेताना दिसतात. खाकी वर्दीतील दोन पोलीस जरी स्टेशनवर गस्त घालत उभे राहिले तर या चोरीला आळा बसेल. मात्र वारंवार घडणाऱ्या घटनांमधूनही शाहूपुरी पोलिसांनी कोणताच धड घेतलेला नाही. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकही या चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरत आहे. पोलिसांचे आणि चोरट्यांचे काही लोगबांधे आहेत काय असा सवाल आता प्रवाशांच्यातून उपस्थित केला जात आहे.

हद्दीचा वाद न घालता गुन्हा दाखल करावा, परिसरात सीसीटीव्हीचे जाळे वाढवा, ठराविक काळासाठी पोलिसांची गस्त वाढवा, दक्ष राहण्याचे प्रबोधनात्मक फलक वाढवा, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हलचालीवर लक्ष द्या, तक्रारींची तातडीने दखल घ्या.

प्रवाशांनी घ्यावयाची खबरदारी

मौल्यवान वस्तू, किमती दागिने सोबत घेणे टाळावे, गर्दीत, बसमध्ये जाण्याचा अट्टाहास टाळावा, मोबाईल, लॅपटॉप सांभाळावा , कमीत कमी सामान सोबत घ्यावे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -