राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. कोल्हापुरात आज, बुधवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध केला.अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेचा काही संबंध नव्हता अशा पद्धतीचे वक्तव्य पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्याच्या निषेधार्थ आज हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पाटील यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
राजकारणाच्या बाबतीत कुठेही नाक खूपसून प्रसार माध्यमातून आपण वेगळे आहोत हे दाखवून देण्याचा पाटील यांचा जुना धंदा आहे अशा शब्दात जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पाटील यांचा समाचार घेतला आहे. यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी. रवी इंगवले यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.