मुंबई इंडियन्सने हैदराबादचा 14 धावांनी पराभव केला. मुंबई संघाने सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवत हॅटट्रिक केली आहे.पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 192 धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाचा पराभव झाला. मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघ शेवटच्या षटकात ऑल आऊट झाला.
आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर 14 धावांनी पराभव केला.अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात हैदराबादला विजयासाठी शेवटच्या 12 चेंडूत 24 धावांची गरज होती.एकोणीसाव्या षटकात कॅमेरॉन ग्रीनने चार धावा दिल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात अर्जुन तेंडुलकरने दमदार गोलंदाजी करत आपल्या संघाला 14 धावांनी विजय मिळवून दिला. अर्जुनने शेवटच्या षटकात एक गडी बाद केला.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत पाच गडी गमावून 192 धावा केल्या.लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 19.5 षटकांत 178 धावांत सर्व गडी बाद झाला. सनरायझर्सच्या विजयाची मोहीम मोडीत काढत मुंबई इंडियन्सने हॅटट्रिक केली.
गेल्या दोन सामन्यांत विजय मिळवलेल्या हैदराबादला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. मुंबईचा हा सलग तिसरा विजय आहे.हैदराबादच्या मयंक अग्रवालने 41 चेंडूत सर्वाधिक 48 धावा केल्या. हेनरिक क्लासेनने 16 चेंडूत 36 धावा केल्या. कर्णधार एडन मार्करामने 22 धावांवर बाद झाला. तर, मार्को जॅनसेनने 13 धावा आणि वॉशिंग्टन सुंदरने 10 धावा केल्या.हॅरी ब्रूक 9 धावांवर, तर राहुल त्रिपाठी सात आणि अभिषेक शर्मा एक धावा काढून बाद झाले. संघाला अखेरच्या षटकांमध्ये अब्दुल समदकडून स्फोटक फलंदाजी अपेक्षित होती, मात्र तो 12 चेंडूत केवळ नऊ धावा करून बाद झाला.