आलिशान गाडीत दोन पिस्टल, चाकू आणि तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या बुधगाव मधील सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले. संदीप आनंदा निकम (वय ३१ रा. बुधगाव ) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून एक ह्युंदाई कंपनीची कार, दोन देशी बनावटीचे पिस्टल, पाच जिवंत काडतुसे, एक चाकू आणि एक तलवार असा एकूण ३ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधगाव औटपोस्ट जवळ सदरची कारवाई केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना पथकातील सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशाणदार यांना माहिती मिळाली की, संशयित संदीप निकम हा कार (क्र. एमएच १० सी. ए. ५७८६ ) मध्ये चाकू व पिस्टल घेवून दहशत माजवत आहे. सदरची गाडी ही बुधगांवचे दिशेने जात आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी गाडीचा पाठलाग करून बुधगांव औट पोस्ट समोर केलेल्या नाकाबंदीवेळी गाडी थांबवली. गाडीमध्ये संशयित संदीप निकम होता. त्याची झडती घेता कमरेला पिस्टल मिळून आले, पॅन्टच्या खिशात एक जिवंत काडतुस व तसेच गाडीची झडती घेतली असता गाडीच्या पुढील ड्रॉव्हरमध्ये एक चाकू मिळून आला. चौकशीमध्ये त्याच्याकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. यावेळी त्याच्याकडून २५ हजारांचे एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतुस, चाकू जप्त केला.
संदीप निकम यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले कि, आणखी एक पिस्टल, ४ जिवंत काडतुसे व एक पितळी मुठीची स्टीलची तलवार घरात लपवुन ठेवली आहे. यानंतर त्याच्या घरामध्ये छापा मारुन ५० हजारांचे एक देशी बनावटीचे पिस्टल, ४ जिवंत काडतुसे आणि तलवार असा एकूण ३ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदरच्या दोन पिस्टल, तलवार आणि चाकू या राजस्थान मधील संदीप नाव असलेल्या एका व्यक्तीकडून आणले असल्याचे सांगितले. संदीप निकम हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याच्यावर यापुर्वी सांगली ग्रामीण, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, जळगाव पोलीस ठाणे येथे मारामारी, आर्म अॅक्ट, अपहरण यासारखे गुन्हे दाखल आहेत.