सांगली शहरातील शिंदे मळा परिसरात असणाऱ्या एका बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी घरफोडी केली. घरातील रोख रक्कम, सोन्याच्या दागिन्यांसह चोरटयांनी ७० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सदर घरफोडीची घटना हि गुरुवार दि. २० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गजानन विश्वनाथ पाटील (वय ६३ रा. शिंदे मळा) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गजानन पाटील हे आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसरातील शिंदे मळा येथील बिरनाळे स्कुल समोरील घरात राहतात. बुधवार दि. १९ रोजी पहाटेच्या सुमारास ते कुटुंबियांसह बाहेर गावी गेले होते. यावेळी अज्ञात चोरटयांनी बंद घरावर पाळत ठेऊन घराच्या मुख्य दरवाजाला असणाऱ्या ग्रीलचे लॉक तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले दहा हजार रुपये रोख, ६१ हजार ७०० रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण ७० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करत पोबारा केला. पाटील हे दुसऱ्या दिवशी गुरुवार दि. २० रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास परतले असता त्यांना घराचे कुलूप तुटल्याचे दिसले. त्यांनी आत जाऊन पहिले असता घरातील साहित्य वास्तव्यास पडले होते.
दागिने आणि पैसे लंपास झाल्याचे दिसले. यानंतर पाटील यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.