सुतारमाळ लक्षतीर्थ वसाहत येथे किरकोळ वादातून एकावर कात्रीने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. सचिन सुधाकर वेर्णेकर (वय ४५ रा. प्लॉट नं.९/१० सुतारमाळ लक्षतीर्थ वसाहत) असे आरोपीचे नाव आहे.
याबद्दल पोलिसांकडून अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे आपल्या पाळीव कुत्र्याला घरात साखळीने बांधत असताना आरोपी याचा मुलगा निल (वय ८ ) हा कुत्र्याला पाहून घाबरला आणि जोरजोराने ओरडू लागला. यावरून वेरणेकर यांनी कुत्र्याला तू माझ्या मुलासमोर आणत जाऊ नकोस असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली आणि घरातील कात्री आणून फिर्यादीच्या डोक्यात व कानाच्या पाठीमागील बाजूस कात्रीने मारून जखमी केले. वेरणेकर यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संकपाळ करत आहेत.