सराफ व्यावसायीकांचा हॉलमार्किंगला विरोध नाही, पण ’एचयुआयटी’ (हॉलमार्किंग युनिक आयडी) ही एक ’विध्वंसक प्रक्रिया’ असून ती दागिन्यांची कोणतीही सुरक्षा देत नाही. यामुळे हॉलमार्कींगमधील ’एचयुआयटी’ ला विरोध असून ती रद्द करावी, या मागणीसाठी सराफ व्यावसायिकांच्यावतीने एकदिवसीय देशव्यापी लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे.
हा बंद सोमवारी (दि. 23) होणार असून कोल्हापूरात जिल्हा प्रशासन व सर्व खासदारांना या संदर्भातील निवेदन देण्यात येणार आहे.
’एचयुआयडी’ प्रक्रिया ग्राहक हिताच्या विरोधात आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या तत्त्वाविरोधात असून ग्राहक व ज्वेलर्सना त्रासदायक आहे. तसेच ग्राहकांच्या गोपनीयतेत हस्तक्षेप करणारी असल्याची माहिती, कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल व कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
16 जून 2021 पासून 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य केले. या प्रक्रियेसाठी दरवर्षी सुमारे 10-12 कोटी तुकडे केले जातात, असा अंदाज आहे. एका वर्षात हॉलमार्क होणार्या तुकड्यांची एकूण संख्या सुमारे 16 ते 18 कोटींच्या (cr)घरात आहे. हॉलमार्किंग केंद्रांत दररोज दोन लाख तुकड्यांचे हॉलमार्कींग करण्याची क्षमता आहे. या वेगाने या वर्षाचे उत्पादन चिन्हांकित करण्यासाठी सुमारे 800 ते 900 दिवस म्हणजेच 3 ते 4 वर्षांचा कालावधी लागणार आहे. शिवाय एचयुआयटी उत्पादनांना हॉलमार्क करण्यासाठी दागिने कापणे, वितळवणे आणि स्क्रॅप करणे यामुळे सुमारे 5 ते 10 दिवस लागणार आहेत.