Tuesday, April 23, 2024
Homeकोल्हापूरसोमय्या आज कोल्हापुरात !

सोमय्या आज कोल्हापुरात !

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या मंगळवारी कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. दरम्यान, कोल्हापुरात जाऊन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार असल्याचे सोमय्या यांनी मुंबईत म्हटले आहे.


जिल्हा प्रशासनाने 19 सप्टेंबरला सोमय्या यांना जिल्हाबंदी केली होती. हा आदेश सोमवारी मागे घेण्यात आला. मंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना सोमय्या यांचा दौरा शांततेत पार पडू द्या. त्यांना कोठे जायचे असेल तेथे जाऊ द्या, असे आवाहन केल्याने तूर्त तणाव निवळला असला, तरी ‘हाय व्होल्टेज ड्रामा’च्या या दुसर्या अंकाकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
20 सप्टेंबरला कोल्हापूरला यायला निघालेले सोमय्या यांना जिल्हा प्रवेशबंदीमुळे कराड येथूनच मुंबईला माघारी फिरावे लागले होते. त्यानंतर आता मंगळवारी ते पुन्हा कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) तशी तक्रारही दाखल केली आहे. गडहिंग्लज साखर कारखाना चालवण्यास देताना 100 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबत मुरगूड पोलिस ठाण्यात प्राथमिक तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. त्यांना कागल आणि मुरगूड नगर परिषदेने ठराव करून गावबंदी केली. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी सोमय्या यांचा दौरा शांततेने पार पाडण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

यंत्रणा सतर्क : अॅक्शन प्लॅन तयार
सोमय्या यांच्या सुधारित दौर्यात कारखाना भेट रद्द करून अंबाबाई मंदिरात बाहेरून दर्शन आणि मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. सोमय्या यांचा दौरा शांततेत पार पडण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व शक्यता गृहीत धरून अॅक्शन प्लॅन तयार ठेवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -