शेअर मार्केट म्हणजे काय, तिथं पैसे गुंतवले की बुडतात, असा समज काही वर्षांपूर्वी गुंतवणूकदारांचा होता. पण आता बँका, जमीन, सोने गुंतवणुकीतून मिळणार्या मर्यादित उत्पन्नापेक्षा थोडा अभ्यास करून जादा उत्पन्न देणार्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस शेअर बाजारातील गुंतवणुकीचा टक्का वाढत चालला आहे.
शेअर बाजारातील आपल्याला कोणतीच माहिती नाही. पैसे मिळण्यापेक्षा बुडतात जास्त हे सांगणारे खूप होते. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे फारसे धाडस कोणी करत नव्हते. पण आता परिस्थिती बदलत आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची हे सांगणारे कित्येक ब—ोकर्स आहेत. अशा ब—ोकर्सकडे पैसे गुंतवले की ग्राहकही शेअर मार्केटची माहिती घेऊ लागतो. आता तर मोबाईलच्या एका क्लिकवर मार्केट समजते. यातूनच स्टॉक एक्स्चेंज, म्युच्युअल फंड, गोल्ड आणि एसआयपी, शेअर मार्केटमधील चढउतार समजून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. डे ट्रेडिंगसह दीर्घकालीन गुंतवणूक तसेच डीमॅट अकौंटची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीला पसंती दिली आहे. केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातील गुतंवणूकदारही आता शेअर बाजारात गुंतवणूक करू लागला आहे. कोल्हापुरातील गुंतवणूकदारांचा टक्का वाढत चालला आहे.