Sangli: जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक आणि लाडेगावच्या (ladegaon) घोल परिसरात शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या रात्रीच्या सुमारास विहिरीत पडला. सकाळी शेतकरी मोटर चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी विहिरीतून जोरात आवाज येत असल्यामुळे ते भयभीत झाले होते. त्यांनी विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले. संबंधित शेतकऱ्यांनी ही माहिती वनविभागाला कळवली.
वन विभागाचे कर्मचारी तात्काळ पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला बाहेर लढण्यात यश आले. बिबट्या इतक्या मोठ्या ओरडत होता की, तिथं त्याला बघण्यासाठी लोकं जमली होती.क्रेनच्या साहाय्याने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेला बिबट्या अंदाजे सहा महिन्याचा बिबट्या असावा असा अंदाज वनविभागाकडून सांगण्यात आला आहे. ऐतवडे बुद्रुक सह, ढगेवाडी, कार्वे, शेखरवाडी, लाडेगाव, इटकरे, येडेनिपाणी, कुरळप परिसरात अनेकवेळा बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या मेंड्या, कुत्री, जनावरे इत्यादीवर हल्ले झाले आहेत.
विहिरीत बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतामध्ये मशागतीचे कामे चालू असल्यामुळे लोकांच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे. बिबट्या विहिरीत पडल्याचे परिसरामध्ये समजल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची जाम गर्दी झाली होती. गर्दीला हटवताना वनविभागाची पोलिसांची दमछाक झाली. ऐतवडे बुद्रुकचे तलाठी मकरंद अनेकर सह कुरळप पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्यावेळी उपस्थित होते.सांगली जिल्ह्यात अनेक तालुक्यात बिबट्याचं दर्शन लोकांना होत आहे. सांगली जिल्ह्यात काही तालुक्यात उसाची शेती अधिक असल्यामुळे त्या भागात बिबट्यांचं प्रमाण अधिक वाढलं. काही बिबट्यांनी लोकांवरती हल्ला सुद्धा केले आहेत. त्याचबरोबर काही बिबटे रोज लोकांना दर्शन देतात. त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.