राज्यात आज अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींत आमदार हसन मुश्रीफ यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळाली. गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीतर्फे गडहिंग्लजमध्ये राबवलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो प्रसिद्ध करण्यामागचे गुपित आजच्या घटनेने उलगडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीतर्फे २५ जून रोजी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम झाला. तत्पूर्वी, या कार्यक्रमाच्या प्रसारासाठी राष्ट्रवादीतर्फे प्रसिद्ध केलेल्या जाहीरात पत्रकात मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी नेते शरद पवार, अजित पवार यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो वापरले. मुश्रीफ यांच्या जाहीरातीत शिंदे व फडणवीसांच्या फोटोमुळे राजकीय अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हा उपक्रम शासनाचा आहे. शासनाचे नेतृत्व शिंदे (Eknath Shinde) व फडणवीस करीत आहेत.
यामुळे त्यांचे फोटो वापरल्याचे स्पष्टीकरण मुश्रीफ यांनी दिले होते.मात्र त्याचे खरे कारण कोणते होते, याचा उलगडा आजच्या घडामोडीनंतर झाल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरु आहे. आठवड्यापूर्वी या घडामोडींची जाणीव मुश्रीफ यांना होती हे यातून स्पष्ट होत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.राष्ट्रवादीच्या ३५ हून अधिक आमदारांसमवेत शिंदे-फडणवीस सरकारला पाठींबा देण्याचा अजित पवार यांचा निर्णय एका रात्रीचा नाही. याची तयारी आधीपासूनच सुरु असावी.
मात्र त्याची कुणकूण कोणालाही लागू दिलेली नव्हती.आठवड्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहीरात पत्रकात शिंदे-फडणवीसांचे फोटो वापरले तेंव्हाच त्यामागच्या कारणांची उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अजित पवार सहकारी आमदारांच्या सोबतीने आज सरकारमध्ये सामील झाले. राष्ट्रवादीतील मंत्रिपदाच्या नऊ नेत्यांमध्ये मुश्रीफ यांचा सहभाग असल्याचे कळताच आठवड्यापूर्वीच्या जाहीरातीतील त्या फोटोंमागचे खरे गुपित उलगडल्याची चर्चा जोरात सुरु आहे.
कार्यकर्त्यांना मागमूसही नाहीदरम्यान, शनिवारी (ता. १) सायंकाळपर्यंत मुश्रीफ गडहिंग्लजमध्येच होते. एका विवाह समारंभालाही त्यांनी उपस्थिती लावली. परंतु त्यांच्या दिवसभरातील दौऱ्यात कार्यकर्त्यांना या राजकीय भूकंपाचा मागमूसही लागला नव्हता. रात्रीच ते मुंबईला रवाना झाले असण्याची शक्यताही कार्यकर्त्यांतून वर्तविण्यात येत होती.