कोल्हापूर महामार्गावरील वाढते अपघात लक्षात घेऊन १६ मार्चपासून महामार्गावर दुचाकीस्वारांना ‘नो हेल्मेट नो एन्ट्री’ अशी विशेष मोहीम राबविली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी आज दिली
जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, विशेषतः दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघातांत हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवितहानी झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेटचा वापर केवळ कायदेशीर बंधन नसून, स्वतःचा जीव वाचविण्याचा सर्वांत प्रभावी उपाय आहे. अपघातावेळी डोक्याला होणारी गंभीर दुखापत टाळण्यासाठी हेल्मेट योग्य पद्धतीने (पट्टा घट्ट बांधून) वापरणे अत्यावश्यक आहे. वाहन चालविताना चालकासह मागील आसनावरील प्रवाशानेदेखील हेल्मेट परिधान करणे अनिवार्य आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील सीमा तपासणी नाका, कागल व किणी टोल नाका येथे “नो हेल्मेट नो एन्ट्री” अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर विना हेल्मेट वाहन चालवू नये. कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा आणि “हेल्मेट वापरा-जीवन वाचवा” हा संदेश सर्वत्र पोहोचवावा.






