धबधब्याचं गाव म्हणून राज्यभर चर्चेत असलेलं बर्की गाव (Barki Village) पर्यटकांनी फुलून गेलंय. परिसरातील निसर्गसौंदर्य व धबधब्यांचा (Bajarbhogav Fountain) दुग्धवर्षाव पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत. धबधब्यांनी गाव नटलं आहे. मात्र, शासनाची गावावर कृपादृष्टी झालेली नाही. त्यामुळे पर्यटनस्थळ म्हणून विकासाची गंगा येथे आणल्यास स्थानिकांच्या रोजगाराची संधी निर्माण होण्यास भरपूर वाव आहे.
कोल्हापूर शहरापासून अवघ्या ५५ किलोमीटर अंतरावर गाव आहे. कोल्हापूर-कळे-बाजारभोगाव-करंजफेण बर्की तसेच कोल्हापूर- मलकापूर मार्गेही बर्कीला येता येते. धबधब्याचा दुग्धवर्षाव पाहण्यासाठी पर्यटक पावसाळ्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. गावातून सुमारे तीन किलोमीटर अंतराची पायपीट करत निसर्गाशी हितगुज साधत जाण्याचा एक वेगळाच आनंद मनाला ऊर्जा देण्याबरोबर मंत्रमुग्ध करतो. घामावलेल्या शरीरावर धुक्यातून वाट शोधत येणाऱ्या पावसाच्या सरी व थंडगार घोंगावणारा वारा धडकतो. यावेळी निळ्याभोर आकाशातून भ्रमण करत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.
निसर्गसौंदर्य न्याहाळत पुढे जाताना चढउताराची पायवाट लागते. बर्की तलावातील निळेभोर पाणी व समोर हिरव्यागार जंगलाच्या कवेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्न करणारे धबधबे, वारा, पाऊस व धुके यांचा चाललेला पाठशिवणीचा खेळ मनाला उभारी देतो. पायवाटेवर चालून आलेला क्षीण वाऱ्यारोबर भुरकन उडून जातो. पेंडाखळे वनविभागाने पुढाकार घेऊन जंगलातील पायवाटेवर दगडी पिचिंगची वाट केल्याने वयोवृद्ध तसेच महिला पर्यटकांना नीट जाता येत आहे. त्यामुळे वनविभागाच्या कामाबाबत पर्यटकातून समाधानाची भावना आहे.
बर्कीला पर्यटकांची मांदियाळी वाढू लागल्याने स्थानिक लोकांना रोजगार मिळू लागलाय. अस्सल गावठी शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा कडक आस्वाद पर्यटकाना घेता येतोय. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातून पर्यटक बर्कीला भेट देत आहेत. येथील ग्रामीण जीवन पाहून पर्यटक खूश होत आहेत. मात्र, सरकारकडून पर्यटकांना म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.