औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी आतापर्यंत ३६ जणांना अटक करण्यात आली असून त्यात ३ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अल्पवयीन मुलांना आज बालन्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
‘काल दुपारपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य झाली आहे. ४ सीआरपीएफ कंपन्या, ३०० पोलिस कॉन्स्टेबल्स आणि ६० अधिकारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले, स्टेटस ठेवणारे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. कोल्हापूरच्या दंगल प्रकरणी ३६ लोकांना अटक करण्यात आलीय. यात ३ जण अल्पवयीन मुले असून त्यांना बाल न्यायालयात हजर करणार आहोत. एकच स्टेटसचं अन्य सर्वांनी कॉपी केलं होतं. स्टेटस ठेवणारे सर्व कॉलेजचे विद्यार्थी होते. कोल्हापूर शहरात बाहेरुन कुणी आलेले आहेत, असे मी म्हणणार नाही. दुकानांच्या बाहेर सीसीटीव्ही फुटेज पाहिले जाईल, जाणूनबुजून कुणी शहराबाहेरून आले होते का, हे पाहिले जाईल, असेही ते म्हणाले.
ज्यांना अटक केली आहे, ते तरुण आहेत. त्यांनी सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केले होते. स्टेटस ठेवणारे सर्व ५ जण महाविद्यालयीन तरुण आहेत. तर ३ अल्पवयीन मुले आहेत. काल ज्यांनी बंद पुकारण्याचे आवाहन केले होते, त्यांनी जर त्यामध्ये प्रक्षोभ वक्तव्य केलं असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. पंचनामे काल पूर्ण झाले आहेत. पहाटेपर्यंत मी स्वत: पंचनामे करत होतो.
हा स्टेटस कुणी क्रिएट केला हे सायबर पोलिसांकडून तपास केला जाईल. काल पालकमंत्री स्वत: येऊन शांतता समितीची बैठक घेतली आहे.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित पुढे म्हणाले, आज दीड हजार होमगार्ड बोलावले आहेत. एसआरपीएफच्या २ तुकड्या, सांगली साताऱ्यातील १० अधिकारी आणि १०० पोलीस बोलावले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोलिंग सुरू आहे. आक्षेपार्ह स्टेटस दिसल्यास लगेच कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापुरात इंटरनेट आज रात्री १२ पर्यंत बंद होणारच.
कोल्हापूरातील वातावरण शांत आहे. इचलकरंजी, गडहिंग्लज, आजरा येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत. अजूनही काही सीसीटीव्ही पाहून त्यांची ओळख पटवून आम्ही त्यांच्यावर अटकेची कारवाई करणार आहे. जे जे दगडफेकीमध्ये दिसत आहेत त्यांच्यावर कारवाई होणार. गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोलीस जाणार आणि सर्व शोधून काढणार आहोत.
वरणगे पाडळीतही प्रार्थना स्थळी तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. यावेळी याप्रकरणातील आरोपींवर रात्री गुन्हा दाखल केला आहे.