कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नावलीपैकी धारवाडीचे स्थलांतर करण्यात आले आहे. ‘गाडमाळी’ नावाच्या शेती असलेल्या भागात डोंगराला भेगा पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करून 48 कुटुंबांचे स्थलांतर केले. डोंगराला भेगा पडल्याने भूस्खलनाचा धोका आहे.
डोंगराला भेगा पडल्याचे लक्षात आल्यानंतर तहसीलदारांसह प्रशासनाने धारवाडीत तळ ठोकला. इर्शाळवाडी घटना ताजी असल्याने धारवाडीतील ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य केल्याने 48 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. यामधील अनेकांनी नातेवाईकांकडे सहारा घेतला आहे. 15 लोक निवारा केंद्रात आहेत. स्थलांतरित कुटुंबाचे पशुधन गावामध्येच आहे.
दरम्यान, हातकणंगले तालुक्यातील हुपरी-इंगळी दरम्यान कोल्हापुरे मळा भागात रस्ता खचल्याने धोका निर्माण झाला आहे. रस्ता खचल्यानंतर प्रशासनाने तातडीने वाहतूक बंद केली आहे. सुमारे पन्नास मीटरपर्यंत रस्त्यास भेग पडून त्याचा भराव लगतच्या ओढ्यात गेला आहे. अन्य ठिकाणी रस्ता एकाबाजूने खचला आहे.