कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांत 30 जुलै पर्यंत 74.06 टीएमसी पाणीसाठा झाला. गतवर्षी याच दिवसांपर्यंत झालेल्या पाणीसाठ्याच्या तुलनेत यावर्षी 5 टीएमसी जादा पाणीसाठा झाला आहे.गतवर्षी 69.25 टीएमसी साठा झाला होता.
यावषी जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील धरणांत यावर्षी एकूण क्षमतेच्या 80.71 टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच दिवसांत एकूण क्षमतेच्या 75.46 टक्के साठा झाला होता. राधानगरी, दूधगंगा, वारणा, तुळशी आणि पाटगाव या प्रमुख पाच धरणांत 59.57 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश सर्वच धरणे येत्या 15 ते 20 दिवसांत पूर्ण क्षमतेने भरतील अशी शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोदे, जांबरे आणि जंगमहट्टी ही तीनच धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. यावर्षी मात्र राधानगरी, कडवी, कोदे, जांबरे आणि घटप्रभा ही पाच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. राधानगरी भरल्याने कोल्हापूरच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी 30 जुलैपर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सरासरी 342 मि. मी.जादा पाऊस झाला आहे. प्रमुख 15 धरणांत यावर्षी एकूण 36 हजार 275 मि.मी.पाऊस कोसळला. गतवर्षी याच कालावधीत 31 हजार 143 मि.मी. पाऊस झाला होता.
जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील धरणे गतवर्षीच्या तुलनेत 5.25 टक्के जादा भरली आहेत. गतवर्षी जिल्ह्यातील धरणे 30 जुलैपर्यंत सरासरी 75.46 टक्के इतकी भरली होती. यावर्षी ती 80.71 टक्के इतकी भरली आहेत.