कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरल्याने आता पंचगंगेच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने घट होत आहे. धोका पातळीपर्यंत पोहचलेली पंचगंगा आता इशारा पातळीच्या आत आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पंचगंगेची धोका पातळी ४३ फूट असली तर, जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पंचगंगा धोका पातळीच्या जवळ पोहचली होती. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली होती. प्रयाग, चिखली आणि आंबेवाडी या सह कोल्हापूर शहरात ज्या-ज्या ठिकाणी पुराचा फटका बसतो त्या ठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर देखील करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून पावसाने दिलासा दिल्याने नद्यांच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला असलेला पुराचा धोका सध्या तरी तूर्तास टळला आहे.
आज सायंकाळी आठ वाजता पंचगंगेची पाणी पातळी ३८ फुट ५ इंचावर पोहचली होती. तर जिल्ह्यातील ३३ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणाचा सहा क्रमांकाचा स्वयंचलीत दरवाजा खुला असल्याने यातून २ हजार ८२८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दरम्यान कोल्हापूर-गगनबावडा हा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरू झाली आहे. जिल्ह्यातील अनेक मार्गावरील पाणी पातळी कमी झाल्यामुळे मार्ग सुरू झाले आहेत. कोकणाकडे जाणारे सर्व मार्ग सुरू झाले आहेत.
अलमट्टी धरणातून एक लाख क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे महापुराच्या पार्श्वभूमीवर थोडासा दिलासा असून सध्या तेरवाड बंधाऱ्यावर ५६ फूट ३ इंच इतकी पाण्याची पातळी असून शिरोळ बंधाऱ्यावर ५० फूट ३ इंच, यादव फुल ५० फूट ५ इंच तर कुरुंदवाड – शिरढोण पुलावरून दोन फूट पाणी वाहत आहे. गेल्या आठवड्याभरात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने तालुक्यातील नागरिकांच्या मध्ये महापुराची भीती निर्माण झाली होती मात्र, गेल्या तीन दिवसापासून अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे शिरोळ तालुक्यात महापुराचा धोका टळला असल्याचे चित्र सध्या शिरोळ तालुक्यातून दिसून येत आहे.
रविवारी सुट्टी असल्याने पंचगंगा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी लहान मुलांसह नागरिकांनी पंचगंगा नदी घाट याचबरोबर ऐतिहासिक कळंबा तलाव परिसरात मोठी गर्दी दिवसभर पाहायला मिळाली. कोल्हापूर शहर, कळंबा आणि पाचगावला पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारा ऐतिहासिक कळंबा तलाव २७ फूट पाण्याची पातळी भरल्यानंतर या तलावातील पाणी पूर्व बाजूला असणाऱ्या सांडव्यावरून पडू लागले आहे. सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्याचे निसर्गरम्य रूप पाहण्यासाठी आणि या पाण्यात चिंब भिजण्यासाठी लहान मुले, मुली, महिला, युवक, आबालवृध्द आणि नागरिकांची गर्दी याठिकाणी वाढू लागली आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभुमीवर या कळंबा तलाव परिसरात खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि गाड्या लावण्यात आल्या आहेत.
दरम्यान प्रशासन यंत्रणा गाफील न राहता आपत्ती व्यवस्थापन आणि वजीर हा रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देणे, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणे, निवारा शेडचे नियोजन करणे या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
करवीर तालुक्यातील बालिंगे येथील पंचगंगा नदीवरील गगनबावडाकडे जाणार मार्गावरील पुलावरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून पूल धोकादायक असल्यामुळे अवजड वाहनांना प्रवेश बंद केला होता. मात्र आजपासून या मार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश दिला गेला आहे. सायंकाळी मार्गावरील पोलिसांनी बॅरिकेट्स काढून प्रवेश सुरू केला.