राष्ट्रवादीतील अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे काही जिल्ह्यांतील पालकमंत्रिपद बदलले जाणार आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे. कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपचे नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्ह्यातील नेते वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची नावे चर्चेत आहेत. 15 ऑगस्टपूर्वी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.शिवसेना (शिंदे गट) व भाजप सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील समर्थक आमदारांच्या गटाची एंट्री झाल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा खळबळ उडाली. भाजप सरकारला पाठिंबा देणार्या अजित पवार गटाला नऊ मंत्रिपदे देण्यात आली आहेत. पण पालकमंत्री अद्याप बदललेले नाहीत. शुक्रवारी अधिवेशन संपत असल्यामुळे येत्या आठ दिवसांत त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
अजित पवार गट सत्तेत सामील होण्यापूर्वी शिंदे गट व भाजपने केलेल्या खातेवाटपामध्ये अपवाद वगळता एका मंत्र्याकडे दोन, तीनपेक्षा अधिक खाती देण्यात आली होती. पालकमंत्रिपदाचेही तसेच झाले होते. एका मंत्र्यांकडे दोन, तीन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. याला पुणे, नंदूरबार, सांगली व नाशिक हे जिल्हे अपवाद आहेत. या जिल्ह्यांच्या पालाकमंत्र्यांवर दुसर्या कोणत्याही जिल्ह्याचा भार देण्यात आलेला नाही. उर्वरित सर्व मंत्र्यांवर एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे. दीपक केसरकर यांच्याकडे मुंबईसह कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे.
दरम्यान, पुण्याच्या पालकमंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे सध्याचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची अडचण होणार आहे. चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असल्यामुळे महायुतीच्या काळात पाच वर्षे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे.
तर अजित पवार गटाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मुश्रीफ हे ज्येष्ठ नेते आहेत; शिवाय त्यांचा कामाचा आवाकादेखील मोठा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुश्रीफ यांच्यासाठी आग्रही असणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
कोल्हापूरचे पालकमंत्री कोण? ‘या’ दोन नावांची चर्चा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -