सांगलीमध्ये तरुणाने मोबाइलवर स्टेटस ठेवून वारणा नदीमध्येउडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील बिळाशी गावामध्ये ही घटना घडली आहे.तुषार गणपती पांढरबळे (२४ वर्षे) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे हा तरुण वाहून गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, बिळाशीला राहणाऱ्या तुषारने शनिवारी वारणा नदीत उडी मारून आत्महत्या केला. तुषार मांगले येथे आपल्या आईसोबत आजोळी राहत होता. याठिकाणीच तो खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. वारणा नदीमध्ये उडू मारुन आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मोबाइवर स्टेटस ठेवले. त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलून नदीत उडी मारली.मला शोधण्याचा प्रयत्न करू नको, मी झोकून दिलं… कुठेही सापडणार नाही… तुझ्याच आठवणीत जगत राहीन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही…’ असा मजकूर त्याने स्टेटसला ठेवला होता. आत्महत्या करण्यापूर्वी तुषार सावर्डे बंधाऱ्यावर बराच वेळ बसला होता.
मोबाइलवर बराच वेळ तो कोणाशी तरी बोलत होता. मोबाइलवर बोलत असतानाच त्याने नदीच्या पाण्यामध्ये उडी मारलीतुषारने जेव्हा नदीमध्ये उडी मारली त्यावेळी त्याठिकाणी मासेमारी करणाऱ्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. तुषारने उडी मारल्यानंतर नदीच्या पाण्याच्या प्रवाहात तो दिसेनासा झाला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो वाहून गेला. त्यानंतर मांगल्याचे पोलीस पाटील संजय कांबळे यांनी घटनेची माहिती शिराळा पोलीस ठाण्यात दिली.
शिराळा पोलिसांना घटनाची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र वारणा नदीचे पात्र मोठे विस्तीर्ण आहे. त्यामुळे तुषारला शोधणे अवघड झाले आहे. बंधाऱ्याच्या खाली पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे तो किती दूर गेला आहे हे समजणे कठीण आहे. त्यामुळे आज सकाळी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. त्याचा शोध अजूनही सुरूच आहे.