करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दुरुस्ती व संवर्धनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. याकरिता राज्य पुरातत्त्व विभागाने प्रक्रिया सुरू केली असून सोमवारी वास्तुविशारद नेमण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी ही माहिती दिली. दरम्यान, गरुड मंडप, नगारखाना व मणकर्णिका कुंडाचा आराखडा पुरातत्त्व विभागाला सादर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले अंबाबाई मंदिर राज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे.
यामुळे मंदिराच्या जतन, संवर्धन आणि दुरुस्तीचे काम पुरातत्त्व विभागाच्या देखरेखाली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली देवस्थान समिती करणार आहे. याकरिता पुरातत्त्व विभागाकडून वास्तुविशारद नेमण्यात येणार आहे.वास्तुविशारदाची नियुक्ती झाल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या नियमानुसार मंदिराच्या कोणकोणत्या भागाची दुरुस्ती करायची, मंदिर परिसरात कोणती कामे करायची, एकूणच मंदिराचे संवर्धन कशा पद्धतीने करायचे, त्याकरिता कोणती कामे करायची याचा आराखडा तयार केला जाईल. हा आराखडा वास्तुविशारदाकडून पुरातत्त्व विभागाला सादर होईल. त्यानंतर पुरातत्त्व विभाग त्यावर निर्णय घेणार आहे. त्याद्वारे मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम देवस्थान समिती सुरू करेल असेही वाहने यांनी सांगितले.
गरुड मंडप, नगारखाना, मणकर्णिका कुंडाचा आराखडा सादर : जिल्हाधिकारी
अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप, नगरखाना आणि मणकर्णिका कुंड दुरुस्तीचा आराखडा राज्य पुरातत्त्व विभागाकडून नियुक्त केलेल्या सल्लागाराकडून तयार केला आहे. त्यानुसार अंदाजपत्रकही तयार केले आहे. अंदाजपत्रकीय आराखडा सोमवारी पुरातत्त्व विभागाल सादर केल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.
पुरातत्त्व विभागाकडून नेमलेल्या सल्लागारांसमवेत तीन बैठका झाल्या. पाहणी झाली. यानंतर आराखडा तयार करण्यात आला. हा आराखडा तपासला जाईल, त्यानंतर तो मंजूर झाल्यानंतर या कामासाठी पुरातत्व विभागाकडूनच कंत्राटदार नेमला जाईल, त्यासाठी लागणारा निधी देवस्थान समिती खर्च करणार असल्याचेही रेखावार यांनी सांगितले. पावसाळ्या संपल्यानंतर हे काम सुरू होईल. मात्र, ते कधी पूर्ण होईल, हे सांगता येणार नाही, असेही रेखावार यांनी स्पष्ट केले.