इचलकरंजी शहरासाठी राज्य शासनाने मंजूर गेलेल्या सुळकूड उद्भव असलेल्या दूधगंगा योजनेच्या समर्थनार्थ बुधवारी महासत्ता चौक ते सांगली नाका रस्त्यावर भव्य मानवी साखळी करण्यात आली. या जनजागृती आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. क्रांतीदिनी जनजागृतीसाठीच्या मानवी साखळीमध्ये बहुसंख्य महिला, अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मुंबईत बैठक दिल्ली येथे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने खास. धैर्यशिल माने यांनी सुळकूड योजनेसंदर्भात मानवी साखळी दरम्यान, जनतेशी दूरध्वनीवरून संवाद साधला. याप्रसंगी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी सुळकुड योजनेसंदर्भात चर्चा झाली आहे. याप्रश्नी आठ दिवसात कागल तालुका आणि इचलकरंजी शहरातील सर्व नेतेमंडळींच्या समवेत बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनजागृतीमधून इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. सुळकूड योजना पूर्णत्वासाठी राजकीय पक्ष विरहित जनजागृती मोहीम शहरातील विविध भागातून सुरू झाली आहे. त्यामध्ये सांगली नाका ते महासत्ता चौक पूर्व, पश्चिम भागातील नागरिकांच्या वतीने बुधवारी सकाळी महासत्ता चौक ते सांगली नाका या दरम्यान रोडवर मानवी साखळीचे आयोजन केले होते. सुमारे तासभर झालेल्या जनजागृतीमध्ये आसरा नगर, सिद्धिविनायक कॉलनी,मधुबन सोसायटी, निशिगंध सोसायटी, सोलगेमळा, साईट नंबर १०२, येलाच मळा, सहकार नगर, गुलमोहर कॉलनी, वृंदावन कॉलनी, मथुरा नगर, पाटील मळा आदी भागातील नागरिकांसह शहराच्या विविध भागातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सुमारे तासभर सुरू असलेल्या या जनजागृती मोहिमेत महिला, युवती, युवक, नागरिक, जेष्ठ नागरिक हातामध्ये जनजागृतीचे फलक घेऊन घोषणाबाजी करत होते.
मानवी साखळी करताना शिस्तबद्धता राखत वाहतुकीला कोणताही अडथळा न करता हा उपक्रम राबविण्यात आला. या जनजागृतीतून शहराला शुद्ध पाणी मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी या मानवी साखळीत सहभाग घेतला होता. आमदार प्रकाश आवाडे हे मानवी साखळीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची भेट घेत पाटील मळा ते सांगली नाका पायी चालत गेले. तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सांगली नाका ते पाटील मळा मार्गावर मानवी साखळी दरम्यान एकीचे दर्शन इचलकरंजी शहराला शुध्दपाणी मिळावे यासाठी आयोजित केलेल्या मानवी साखळीला मोठा प्रतिसाद मिळाला. या मानवी साखळीमध्ये मोठ्याप्रमाणात नागरिकांसह महिला तसेच लहान मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. या मानवी साखळी दरम्यान शहरात एकीचे दर्शन दिसून आले.
याप्रसंगी सांगली रोड परिसर, सांगली नाका ते महासत्ता चौक परिसरातील सर्व पक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला व नागरिक यांच्यासह विठ्ठल चोपडे, रविंद्र माने, मदन कारंडे, तानाजी पोवार, प्रकाश दत्तवाडे, अशोक स्वामी, संजय कांबळे, राहुल खंजिरे, पुंडलिक जाधव, सागर चाळके, शशांक बावचकर, कैश बागवान, प्रताप होगाडे, राजू आलासे, अजित जाधव, सयाजी चव्हाण आदी सहभागी झाले होते.