इचलकरंजी : एका शाळेतील दोन लहान मुलांमध्ये वाद झाला. त्यातून दोन्ही मुलांच्या पालकांमध्ये आधी खडाजंगी आणि नंतर मारामारी झाली. त्यात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सद्दाम सत्तार शेख (वय २७ , रा. स्वामी मळा) असे त्यांचे नाव आहे.याप्रकरणी शब्बीर अब्दुल गवंडी (रा. हनुमाननगर) यांसह दोन महिलांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. हा प्रकार कोले मळा येथील एका शाळेत घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, या घटनेमुळे संतापलेल्या शेख यांच्या नातेवाईकांनी गवंडी याच्या दारावर लाथा मारून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या भागात तणावाचे वातावरण होते. नातेवाईक, भागातील नागरिकांनी आयजीएम रुग्णालयात गर्दी केली होती.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : संबंधित शाळेत पहिलीच्या वर्गात टेम्पोचालक सद्दाम शेख, तसेच सलमा आलासे यांची मुले शिकण्यास आहेत.
दुपारच्या सत्रात खेळता खेळता सलमा आलासे यांच्या मुलाचा शेख यांच्या मुलाशी किरकोळ कारणातून वाद झाला. यातून धक्काबुक्की झाली. आपल्या मुलाला मारल्याचा राग आल्याने शेख याने आलासे यांच्या मुलास कानफटीत मारली.त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी शेख यांची समजूत काढल्यानंतर वादावर पडदा पडला. मुलाला मारहाण झाल्याचे समजताच सलमा यांनी भाऊ शब्बीर गवंडी यांना शाळेत बोलावून घेतले. यावेळी सलमा यांनी मुलाच्या मारहाणीचा जाब विचारला. यातून शेख आणि गवंडी यांच्यात वाद होत दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले.
त्यानंतर दोघांमध्ये झटापट आणि लाथाबुक्क्यांनी मारामारी झाली. त्यात छातीवरही मार बसल्याने शेख जमिनीवर कोसळला. शाळेत शेख यांच्या नातेवाईकांसह भागातील नागरिकानी गर्दी केली. त्यांनी तातडीने शेखला दुचाकीवरून आयजीएम रुग्णालयात दाखल केले; मात्र शेख यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले.शाळा सुटली अन् पालक भिडलेशाळेच्या वेळेत झालेला वाद शिक्षकांनी मिटवला होता; मात्र दोन्ही मुलांचे पालक शाळा सुटण्याच्यावेळी आले होते. यावेळी पुन्हा वादाला तोंड फुटले आणि पालकांच्यात वाद होऊन मारामारी झाली.