Thursday, February 6, 2025
Homeसांगलीदेवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, चार जागीच ठार; सहा जखमी

देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, चार जागीच ठार; सहा जखमी

मिरज-भिगवण राज्यमार्गावर खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडीजवळ मारुती ओमनी कार झाडाला धडकल्याने चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर सहाजण गंभीर जखमी झालेजखमींमध्ये सहा वर्षांच्या मुलाचा समावेश असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातात बनपुरी, सिद्धेश्वर कुरोली व दहिवडी येथील एका पुरुषासह तीन महिला भाविकांचा समावेश आहे. हा अपघात आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला.

पांडुरंग सिद्धराम देशमुख (वय 55, रा. सिद्धेश्वर कुरोली), मालन धनाजी राऊत (55, रा.बनपुरी, ता. खटाव), सुरेखा बबन शिंदे (60, रा. दहिवडी, ता. माण), सुवर्णा संजय शिंदे (45, रा. बनपुरी) अशी मृतांची नावे आहेत. तर, बाळकाबाई तुकाराम देवकर (60, रा. बनपुरी), कोमल तेजेंद्र जाधव (28, रा. निसराळे), अमोल श्रीरंग बनसोडे (30, रा. सिद्धेश्वर कुरोली), सुनंदा श्रीरंग बनसोडे (50, सिद्धेश्वर कुरोली), कुंदा काशिनाथ देशमुख (55, रा. सिद्धेश्वर कुरोली), अन्विक नीलेश देशमुख (6, रा. सिद्धेश्वर कुरोली) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील पांडुरंग देशमुख हे मारुती ओमनीतून भाविकांना घेऊन लोकरेवाडी (जि. सांगली) येथे आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास देवदर्शनासाठी जात होते. चारचाकीत दहा प्रवासीहोते. मिरज-भिगवण या राज्यमार्गावरील सूर्याचीवाडी गावच्या हद्दीत गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी भरधाव वेगात असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये ड्रायव्हर साईडची संपूर्ण बाजू उद्ध्वस्त झाली. मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

या अपघातामध्ये चालक पांडुरंग देशमुख यांच्यासह मालन राऊत, सुरेखा शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुवर्णा शिंदे यांना उपचारासाठी घेऊन जाताना वाटेत मृत्यू झाला. जखमींना ग्रामस्थांनी बाहेर काढून उपचारासाठी वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर, गंभीर जखमींना पुढे उपचारासाठी साताऱयाला पाठविण्यात आले. या घटनेची माहिती कळताच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी भेट दिली. या अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, या अपघाताची माहिती होताच राणंद, सिद्धेश्वर कुरोली, बनपुरी या खटाव आणि माण तालुक्यातील गावांवर शोककळा पसरली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -