जून आणि जुलै महिना भारतीयांसाठी महागाईचे (Inflation) चटके देणारा ठरला. भारतात प्रत्येक वस्तू महाग झाली. आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात संताप होता. पण गेल्या दोन महिन्यात टोमॅटोसह इतर भाजीपाल्याच्या (Vegetable-Tomato Rate) किंमती गगनाला भिडल्या आहेत. डाळी, तांदळाने, गव्हाने उच्चांक गाठला आहे. दुधाने तर आधीच सर्व रेकॉर्ड मोडले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंवर भारतीयांचा मोठा खर्च होत आहे. मध्यमवर्ग आणि गरीबांची तर देशात थट्टा सुरु आहे. त्यांना जगणे मुश्कील झाले आहे. कितीही कमाई केली तरी पैसा हातात उरत नसल्याने त्यांची कसरत सुरु आहे. केंद्र सरकारने (Central Government) या महागाईवर जालीम उपाय शोधला आहे. त्यासाठी तातडीने पावले पण टाकली आहे. त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत दिसून येईल. वाढलेले दर पुन्हा जमिनीवर येतील.
महागाईला ब्रेक लावण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल टाकले आहे. नेपाळकडून टोमॅटो आणि इतर भाजीपाला आयात करण्यास मंजूरी दिली. तर केंद्र सरकार आफ्रिकेतून डाळींची खरेदी करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत याविषयीची माहिती दिली. याविषयीचा करार पण करण्यात आला आहे.
जीवनावश्यक वस्तू स्वस्त करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. शेजारील नेपाळमधून टोमॅटोच्या आयातीवर आता कोणतेही प्रतिबंध राहणार नाही. त्यासाठी आयात सुरु करण्यात आली आहे. टोमॅटोची पहिली खेप वाराणसी, लखनऊ आणि कानपूर शहरात पोहचली आहे. काही दिवसांतच टोमॅटोची मोठी आवक नेपाळमधून होईल.
दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या किंमती 25-30 रुपये किलो होत्या. आता या किंमती 150 ते 250 रुपये प्रति किलो आहे. तर काही ठिकाणी हा भाव 220-300 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. व्यापारी, दलाल हे जास्त नफा कमावत आहे. तर शेतकऱ्यांना पण यंदा चांगला भाव मिळाला आहे. पावसाने ओढ दिल्यास दक्षिण राज्यात सुद्धा टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतात अवकाळी आणि मुसळधार पावसाने पिकांचे गणित चौपट केले. त्यामुळे भाजीपाला महागला. टोमॅटोने तर दरवाढीची कुठलीच कसर बाकी ठेवली नाही. काही शहरात टोमॅटो 300 रुपये किलोने विक्री झाला. पण नेपाळमधून आयात सुरु झाल्यापासून टोमॅटोच्या किंमतीत मोठी घसरण दिसून येत आहे.