कोल्हापूर शहरामध्ये (Kolhapur City) गुन्हेगारीच्या घटना दिवसाच्या तुलनेत रात्री अधिक घडतात. त्यामुळे रात्री अकरानंतर हॉटेल, बार, रेस्टॉरंट, हातगाड्या, खाऊ गल्ल्या बंद ठेवल्या तर रात्री होणाऱ्या गुन्ह्याच्या घटना कमी होतील, असा पोलिसांचा अंदाज आहे.
त्यामुळे रात्री अकरानंतर शहर बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. याची अंमलबजावणी सुरू असून, अकरानंतर सुरू असणाऱ्या हॉटेल, बार यांच्यावर कारवाई केली जात आहे. पोलिस प्रशासनाने गुन्ह्यांचा आढावा घेतला असता काही तथ्ये समोर आली आहेत. यामध्ये वादावादीच्या घटना साधारणपणे बार, खाऊ गल्ल्या, काही रहदारीचे चौक, तालीम मंडळांचा परिसर येथे घडतात. या वादावादीचे पर्यवसान मारामारीत होते. यामध्ये कधी कधी शस्त्रांचा वापर होतो. त्यातून गंभीर जखमी होण्याचा धोका असतो. काही वेळा खुनाच्या घटनाही घडल्याचे दिसते.
या मारामारीतील फिर्यादी आणि आरोपी हे बहुतांशी वेळा मद्यपान केलेले असतात. त्यातूनच पूर्ववैमनस्यातील वाद उफाळून येतात. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी रात्री अकरानंतर शहरातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट, खाऊ गल्ल्या बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाणारे सर्वसामान्य नागरिक हे रात्री अकराच्या आधीच जातात. त्यामुळे रात्री अकरानंतर सर्वसामान्य ग्राहकही फारसे नसतात. त्यामुळे पोलिसांनी हा उपाय चालू केला आहे.
गस्त वाढवण्याची आवश्यकताशहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसर, खासबाग मैदान, शिवाजी स्टेडियम, गांधी मैदान, रंकाळा तलाव व तेथील उद्यान यासह उपनगरांतही काही ठिकाणी गस्त वाढवण्याची आवश्यकता आहे. सायबर कॉलेज ते एस.एस.सी बोर्ड या ठिकाणी ओपन बार भरतो. येथे गस्त वाढवल्यास आळा बसू शकतो. प्रवाशांची गैरसोय शहरात रात्री अपरात्री परगावाहून पर्यटक येतात; पण रात्री अकरानंतर सर्व हॉटेल बंद असल्याने त्यांना जेवणाची समस्या भेडसावते. त्यामुळे पोलिसांच्या या नियमामुळे परगावाहून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. गणेशोत्सव, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रात्री अकरानंतर हॉटेल, बार, खाद्य पदार्थांचे स्टॉल बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.