बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘Salman Khan) ‘बिग बॉस ओटीटी 2’या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला असून एल्विश यादवने (Elvish Yadav) ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान (Abhishek Malhan) उर्फ फुकरा इंसान या दोन स्पर्धकांमध्ये अंतिम लढत पाहायला मिळाली. अखेर एल्विशने यात बाजी मारली.
‘बिग बॉस ओटीटी 2’च्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये एल्विश यादव, अभिषेक मल्हान, मनीषा रानी, बेबिका धुर्वे आणि पूजा भट्ट या पाच स्पर्धकांचा समावेश होता. यात एल्विश आणि अभिषेकमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली. दोघेही युट्यूबर्स असल्यामुळे दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. अभिषेकला 18.7 मिलियन आणि एल्विशला 21.9 मिलियन वोट्स मिळाले आहेत.
‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता होणाऱ्या एल्विशला 25 लाख रुपये आणि ‘बिग बॉस’ची चमकती ट्रॉफी बक्षीस म्हणून मिळाली आहे. एल्विशने ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. गेल्या काही वर्षांपासून वाइल्ड कार्ड स्पर्धक बिग बॉसचा विजेता होत नव्हता. पण एल्विशने 17 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक करत इतिहास रचला आहे.
तर या पर्वाचा अभिषेक मल्हान पहिला रनरअप आणि मनीषा रानी दुसरा रनरअप हरला आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’चा महाअंतिम सोहळा खूपच मनोरंजनात्मक होता.
एल्विश यादव हा एक लोकप्रिय युट्यूबर आहे. युट्यूबच्या माध्यमातून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. 25 वर्षीय एल्विश हा मुळचा गुरुग्रामचा राहणारा आहे. दिल्लीतील हंसराज महाविद्यालयातून त्याने शिक्षण घेतलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये धमाकेदार वाइल्ड कार्ड एन्ट्री करत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एल्विश युट्यूबवर अॅक्टिव्ह असण्यासोबत शॉर्ट फिल्म्सदेखील बनवतो. ‘एल्विश यादव व्लॉग्स’ असे त्याच्या चॅनलचे नाव आहे. एल्विशला महागड्या, आलिशान गाड्यांची आवड आहे.
बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व 17 जून 2023 रोजी सुरू झालं होतं. पुनीत सुपरस्टार, पूजा भट्ट, मनीषा रानी, बेबिका धुर्वे, साइरस ब्रोचा, अभिषेक मल्हान, आलिया सिद्दीकी, फलक नाज, अविनाश सचदेव, जद हदीद, जिया शंकर, आकांक्षा पुरी आणि पलक पुरसवानी हे स्पर्धक ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये सहभागी झाली होते.