नावात काय आहे? असं शेक्सस्पिअरने जरी म्हटलं असलं तरी आपल्याकडे नावामध्येच सगळं काही आहे याची प्रचीती सातत्याने येते. म्हणून नावामध्ये बदलाचं वारंच आपल्याकडे अधून मधून येतं. त्यामुळेच मग शहराचं नाव बदला, गावाचं नाव बदलण्याची भूमिका घेतली जाते. पण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याचं नाव बदलण्याचा एक अजब प्रकार घडला आहे. खरं तर प्रस्ताव चंदगड तालुक्यातील एका गावाचं नाव बदलण्याचा होता. पण त्या गावाचं नाव बदलण्याऐवजी थेट चंदगड तालुक्याचं नाव बदलण्यात आलं. त्यामुळं भलताच घोळ होऊन बसला होता. एनआयसीच्या या एका चुकीमुळे चंदगड तालुक्यातील लोकांना मात्र चांगलाच फटका बसल्याचं दिसून आलंय.
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला चंदगड तालुका आहे. या तालुक्यामध्ये डुक्करवाडी नावाचं गाव आहे. त्या डुक्करवाडी गावाचं नाव रामपूर असं बदलण्याचा प्रस्ताव नॅशनल इम्फॉरमॅटिक सेंटर म्हणजे एनआयसीकडे (NIC) पाठवण्यात आला होता. पण एनआयसीकडून गावाचं नाव बदलण्याऐवजी थेट चंदगड तालुक्याचं नाव बदलण्यात आलं. त्यामुळं ऑनलाईन कागदपत्रांवर आता चंदगड ऐवजी रामपूर तालुका असं नाव येत आहे.
या प्रकारामुळं चंदगड तालुक्यातील नागरिक संभ्रमामध्ये पडले आहेत. चंदगड तालुक्याचं नाव बदललं जाण्याचं हे प्रकरण खूप गंभीर आहे. कारण ऑनलाईन पद्धतीनं कागदपत्रं काढत असलेल्या नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याचं दिसून येतंय. कोल्हापुरात रामपूर तालुका अस्तित्वातच नसल्यानं नागरिकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केवळ नावाच्या बदलामुळं सर्व कामकाज ठप्प झालं आहे.
डुक्करवाडी (Dukkarwadi Village) या गावाच्या नावात बदल करावा अशी मागणी या गावातील नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. त्यानंतर या गावाचं कागदोपत्री नाव बदलून रामपूर असं करण्यात यावं यासाठी एनायसीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. पण एनआयसीने गावाचं नाव न बदलता थेट तालुक्याचंच नाव बदललं आणि घोळ झाला.
सर् ऑनलाईन कागदपत्रांवर तालुका रामपूर आणि जिल्हा कोल्हापूर असं नाव येत आहे. त्यामुळे कामकाज ठप्प झालं आहे. ज्या नागरिकांना ऑनलाईन कागदपत्रं हवी आहेत त्यांनी ती लगेच घेऊ नयेत, कारण त्यामुळे अडचण येऊ शकते. ही चूक दुरुस्त झाल्यानंतर कागदपत्रं घ्यावीत असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.