तारदाळ, खोतवाडी या गावांची झपाट्याने वाढ होत असून या परिसरात इंडस्ट्री एरिया व नागरी वसाहतींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे परंतु अपुऱ्या सुविधांमुळे व विजेच्या लपंडावामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या दोन वर्षात शेतकरी वर्गाचे विजेच्या तुटवड्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तारदाळ, खोतवाडी या दोन्ही गावांमध्ये विद्युत महामंडळाचे केवळ पाच कर्मचारी असल्याने दोन्ही गावातील विजेच्या समस्या सोडवण्यास कर्मचारी अपुरे पडत आहेत. या भागातील अनेक शेती पंप बंद अवस्थेत आहेत. केवळ कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे शेतकरी वर्गाला केवळ तक्रार नोंदवण्यासाठी एमएसईबीच्या पेट्रोल येथील डिव्हिजनला हेलपाटे मारून आपला वेळ
विद्युत महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष; शेतीचे अतोनात नुकसान
वाया घालवावा लागत आहे. तसेच अनेक कारखाने वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने बंद अवस्थेत ठेवावे लागत आहेत. परिणामी मालक वर्गही कारखानदारीच्या व्यवसायाला विजेचे लपंडावामुळे अक्षरशः त्रासून गेल्याचे
दिसून येत आहे.
गेल्या दोन वर्षात तारदाळ, खोतवाडीमध्ये वीज मंडळाचे कर्मचारी कमी असल्याने ग्राहकांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा घरगुती लाईट बंद असते, कारखाने बंद असतात, शेती पंप बंद असतात याबाबत पाठपुरावा करूनही महामंडळाचे कर्मचारी कमी असल्याने यावर तोडगा निघत नाही त्यामुळे महामंडळाने याकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे.
मगदूम मळा, चौगुले मळा, पवार मळा, पाटील मळा या ठिकाणचे अनेक डीपी वारंवार बंद पडल्याने या भागातील शेतकरी वर्ग या विजेच्या लपंडावाला कंटाळला आहे तसेच अनेक ठिकाणी घरगुती लाईट बंद आहेत पण यांना चालू करायला आठ दिवस लागतात. त्यामुळे तारदाळ खोतवाडीच्या ग्रामस्थांनी एमएसईबीच्या दिरंगाईच्या विरोधात निषेध व्यक्त केला आहे. चालू वर्षी पावसाने ओढ दिल्याने बळीराजा आहे त्या पाण्यावर शेती करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु वीजच नसल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. परंतु विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कोणतेच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
याबाबत अनेक शेतकरी वीज मंडळाचे कार्यालयाचे हेलपाटे मारून दमले आहेत. खरं तर तारदाळ, खोतवाडी या परिसरातील इंडस्ट्री एरिया व व्यवसायिक यांच्या माध्यमातून होणारे वीज बिलाचे उत्पन्नही चांगल्या प्रकारचे आहे, असे असताना विद्युत महामंडळाला या दोन गावांकडे पहायलाही वेळ नसावा ही अत्यंत खेदाची बाब आहे. या गंभीर समस्या बाबत लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालण्याची गरज ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.